वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आज वर्धा येथे प्रचारासाठी दाखल झाले आहेत. या प्रचारसभेला भाजपासह मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी अगोदर विरोधी पक्षनेते व्हावे. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहू नये. ते स्वप्न या देशातील जनता साकार करणार नाही, असे सांगत रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. तसेच, किधर भी नजर नही आ रही है काँग्रेस की खादी... क्यूंकी इस देश के प्रधानमंत्री बन गए है नरेंद्र मोदी..असे म्हणत काँग्रेसवर हल्लाबोल केला. याचबरोबर, संविधान बदलणार ही निव्वळ अफवा आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी मी भाजपा-शिवसेना युतीसोबत आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या मतदानादरम्यान प्रत्येक टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 सभा आयोजित करण्याचा राज्यातील भाजपा नेत्यांचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबई येथेही जाहीर सभा होणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही व्यासपीठावर उपस्थित असणार असल्याची माहिती मिळत आहे.