वर्धा :
देवळी तालुक्यातील गुंजखेडा वाळू घाटावर राजरोसपणे तराफ्यांच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय आकस्मिक तपासणी पथकाने धाड टाकली. यावेळी पाच तराफांच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले. सर्व तराफे जप्त करुन ते नष्ट करण्यात आले. ही कारवाई बुधवारी दुपारपासून गुरुवारी सकाळपर्यंत चालली.
वर्धा नदीपात्रावरील गुंजखेडा येथील वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात वाळू उपासा चालतो. यापूर्वीही अनेकदा येथे कारवाई झाल्यानंतरही वाळू चोरट्यांचे ह्य पुन्हा येरे माझ्या मागल्या ह्ण असेच सुरु आहे. याची माहिती मिळताच जिल्हा स्तरीय आकस्मिक धाड तपासणी पथकातील जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी आपल्या चमूसह बुधवारी दुपारी साडेचार वाजता गुजखेडा वाळू घाट गाठला. यावेळी घाटामध्ये आठ मजुर पाण्यातील वाळू अवैधरीत्या तराफ्याच्या साहाय्याने बाहेर काढत असल्याचे निदर्शनास आले. आणखी घाटामध्ये पाहणी केली असता पाचवा ही तराफा दिसून आला. हे पाचही तराफे जप्त करुन ते नष्ट करण्याचे काम दुसऱ्या दिवशीपर्यंत सुरुच होते. एका तराफ्याची किंमत ४० हजार रुपये असून एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल महसूल विभागाच्या पथकाने नष्ट केला. या कारवाईमुळे वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.पोलिस म्हणतात 'ऑल ईज वेल'पुलगाव पोलिस विविध कारणांमुळे चांगलेच वादात सापडत आहे. या पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या गुंजखेडा वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा सुरु होता. परंतु तरीही पुलगाव पोलिसांकडून सर्व काही 'ऑल ईज वेल' असल्याचे वरिष्ठांना सांगितले जात होते. परंतु या वाळू चोरीच्या माध्यमातून कुणाचे 'ऑल ईज वेल' होते, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खनिकर्म अधिकाऱ्यांनी दुचाकीवरून गाठला घाटपोलिस आणि महसूल विभागाच्या वतीने वाळू चोरट्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आता वाळू चोरटेही सजग झाले आहे. अधिकाऱ्यावर पाळत ठेवली जात आहे. कोणत्या अधिकाऱ्यांचे वाहन कोण्या दिशेने जातात, यावर लक्ष ठेवण्याकरिता खबऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कारवाईवर ही परिणाम होतो. या सर्व बाबी लक्षात घेता जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी चक्क दुचाकीवरून गुंजखेडा येथील वाळू घाट गाठत ही कारवाई केली. या कारवाईमध्ये देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे, तुषार शिंदे, तलाठी भारत डेहनकर, अजय नागे व मनोहर हांडे यांचा समावेश होता. जिल्ह्यात कुणीही अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करु नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशाराही देण्यात आला.