वर्धा : बिगबॅश २०-२० क्रिकेट लिगच्या सामन्यावर ऑनलाइन जुगार खेळल्या जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कच्ची लाइन परिसरातील या क्रिकेटच्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगाऱ्यांची दांडी उडविली. दोघांना अटक करून त्यांच्याकडून २५ लाख ७३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आसीफ शेख, रा. फुलफैल हा निखिल पंजवानी, रा. दयालनगर याच्यासोबत संगनमत करून २०-२० क्रिकेट लीगच्या सामन्यादरम्यान ऑनलाइन पैशाचे हार-जीतचा खेळ चालवितो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कच्चीलाइन, ऑटो स्टॅन्टजवळ धाड टाकली. तेव्हा आसीफ शेख मेहबूब शेख (४०), रा. फुलफैल व निखिल माधवदास पंजवानी (३२), रा. दयालनगर हे दोघेही मोबाइलद्वारे ग्राहकांसोबत बोलून सामन्याच्या हार-जीतवर, विकेटवर व रणवर बोली लावून जुगार चालवीत असल्याचे दिसून आले. या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडील मोबाइलची तपासणी केली असता कोण-कोण या जुगारात सहभागी आहे, त्या आरोपींचीही नावे पुढे आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून सात मोबाइल, एम.एच. ३२ ए.एस. ४३७३ क्रमांकाची कार तसेच २४ हजार ९५० रुपये रोख असा एकूण २५ लाख ७३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आसीफ शेख आणि निखिल पंजवानी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई शहर पोलिस करीत आहेत.
ग्राहकही झाले आरोपी
पोलिसांनी क्रिकेटच्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगार चालविणाऱ्या दोन्ही आरोपींचे मोबाइल जप्त करून तपासणी केली. तेव्हा जुगार लावणाऱ्या ग्राहकांचीही नावे पुढे आली असून त्यांचाही आरोपीमध्ये समावेश केला आहे. यात जय भगत, शंभू सेट, श्याम चावरे, शाहिद भैया, सूरज नगराळे, सतीश, चिरंजीव, संदीप वानखेडे, प्रशांत डेकाटे, समीर माडिया, विवेक पटमासे, अंडा दिनेश पंजवानी, हसीम शाहा, कटिंग, लखन ऊर्फ जयसिंग चव्हाण, महादेव सेलू यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.