वर्धा : पांदण रस्त्याच्या कामाचे देयक काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वर्धा पंचायत समितीचा शाखा अभियंता विनोद मुरकुटे याला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी केली. वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सध्या कारवाईचा सपाटा लावला असून ही तीन दिवसातील दुसरी तर या वर्षातील आठवी ही कारवाई आहे. पोलीस सूत्रानुसार, कंत्राटदार सुशील मोहनलाल मोहता रा. महादेवपुरा यांना वर्धा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत सेलुकाटे ते वायगाव (नि.) पांदण रस्त्याचे खडीकरणाचे काम १३ व्या वित्त आयोगातून सेलुकाटे ग्रामपंचायत अंतर्गत देण्यात आले होते. सदर काम त्यांनी एप्रिल २०१४ मध्ये पूर्ण केले. सदर कामाच्या देखरेख व मुल्यांकनाची जबाबदारी पंचायत समिती शाखा अभियंता विनोद मुरकुटे यांच्याकडे होती. मुरकुटे याने झालेल्या कामाचे पाच लाख १९ हजार ९४६ रुपयांच्या मुल्यांकनानुसार ग्रामपंचायतीमार्फत मोहता यांना दोन लाख व एक लाख ७५ हजार रुपयांचे दोन धनादेश दिले. पूर्ण कामाच्या मुल्यांकनानुसार उर्वरित कामाचे धनादेश ग्रामपंचायतीकडे पाठविण्याची विनंती मोहता यांनी मुरकुटेकडे केली. तेव्हा मुरकुटे याने एकूण कामाच्या सात टक्क्याप्रमाणे ३५ हजार रुपयांची लाच मागितली. मोहता यांनी अडचण असल्याचे सांगताच मुरकुटे याने २० हजारांची मागणी केली. लाच द्यायची नसल्यामुळे मोहता यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. याप्रकरणी विभागाने सापळा रचला. यानुसार मुरकुटेने लाचेचे २० हजार रुपये घरी नातलगाकडे देण्यास सांगितले. पुराव्याच्या आधारे मुरकुटेला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध वर्धा शहर ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांनी पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात केली. सदर कारवाईत दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्यासह प्रदीप देशमुख, राजेंद्र बुरबुरे, गिरीष कोरडे, निशिथरंजन पांडे, प्रदीप कदम, संजय डगवार, नरेंद्र पाराशर, मनीष घोडे व रागिणी हिवाळे, चालक रमाकांत साळवे यांनी सहकार्य केले.(जिल्हा प्रतिनिधी)
रेल्वे पोलीस निरीक्षक सीबीआयच्या तर अभियंता एसीबीच्या जाळ्यात
By admin | Published: May 10, 2014 12:42 AM