लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तब्बल बारा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी रात्री उशिरापासून जोर धरला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात २३७.७० मिमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोटे, मोठे व मध्यम जलायशातील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. (Rain gave relief to Wardha; 237.79 mm of rainfall)
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. तर अर्धा पावसाळा संपला तरी जिल्ह्यातील जलाशयातील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने वर्धेकरांवर जलसंकटाचे सावट होते. अशातच श्रावणसरी जिल्ह्यात दमदार बरसल्याने वर्धेकरांना दिलासा मिळाला आहे. पण जिल्ह्यातील सर्वच जलाशये अजूनही १०० टक्के भरली नसल्याने दमदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षा आहे.
मागील २४ तासांत जिल्ह्यात २३७.७० मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात ५१.८६ मिमी, सेलू तालुक्यात १५.५५ मिमी, देवळी तालुक्यात ४६.८० मिमी, हिंगणघाट तालुक्यात २१.१५ मिमी, समुद्रपूर तालुक्यात १७.०० मिमी, आर्वी तालुक्यात २८.९७ मिमी, आष्टी तालुक्यात ३१.६० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात २५.०५ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
उभ्या पिकांना मिळाली नवसंजीवनी
पावसाने दडी मारल्याने तसेच ऊन तापत असल्याने कोरडवाहू शेतजमिनीतील सोयाबीन, कपाशी, तूर आदी पीक माना टाकत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. परंतु, रविवारी रात्रीपासून थांबून थांबून झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांना नवसंजीवनीच मिळाली आहे.
जलाशयांत ७६.६४ टक्के जलसाठा
जिल्ह्यात मोठे व मध्यम असे एकूण अकरा जलाशये आहेत. रविवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे या जलाशयातील पाणी पातळीत नाममात्र का हाेईना पण वाढ झाली आहे. सध्या या अकरा जलाशयांत ७६.४१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.