सोयाबीन पाने पिवळी : ११ हजार हेक्टरवरील सोयाबीन धोक्यातआर्वी : तालुक्यात गत २८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बहरलेले सोयाबीन पावसाअभावी पिवळे पडू लागले आहे. सोयाबीन शेंगावर आले असून शेंगा भरण्यासाठी पावसाची गरज आहे. येत्या आठ दिवसात पाऊस न आल्यास हातचे सोयाबीन पीक गमावण्याची भिती बळीराजाला सतावत आहे. तर कपाशी पिकही वाढत्या उकाड्याने प्रभावीत होत आहे. आर्वी तालुक्यात आतापर्यंत ७३८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी तालुक्यात ११ हजार ६२३ हेक्टरवर सोयाबीन, २३ हजार ६५२ हेक्टरवर कपाशी तर १० हजार ७३३ हेक्टरवर तुरीचे पीक आहे. शेतीच्या हंगामात पावसाच्या प्रतिक्षेत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली मशागतीची कामे पूर्ण केली असून पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. सध्या सोयाबीन पिकाच्या शेंगाना त्याची भरण होण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. तालुक्यात ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी मागील आठ दिवसांपासून पिकांना पाणी देणे सुरू केले आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा नाही अशा शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. परंतु वरूणराजाची तालुक्यावर अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आर्वी तालुक्याचे ४७, ९९२ हेक्टर पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली तर ४० हजार हेक्टरचे क्षेत्र कोरडवाहू क्षेत्र आहे. तालुक्यात ३ हजार ७७९ विहिरी असून मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्र असल्याने याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादकांना व त्या पाठोपाठ कपाशी, तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे एकूण चित्र आहे. शेतशिवारात मजूरांची कामे अखेरच्या टप्प्यात कामे आहे. पाऊस वेळेवर न आल्यास मजूरांनाही कामाअभावी घरी राहावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील निंबोली, सर्कसपूर, अहिरवाडा, टाकरखेडा, कर्माबाद, लाडेगाव, नांदपूर, एकलारा, जळगाव, शिरपूर बोडे, देऊरवाडा, राजापूर, इठलापूर, वर्धमनेरी, खुबगाव, नांदोरा, दहेगाव (मु.), बाजरवाडा, रोहणा, पिंपळखुटा, वाढोणा, गुमगाव, तरोडा, वाई, धनोडी, वाढोणा येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे.(तालुका प्रतिनिधी) बळीराजा चिंताग्रस्त कपाशी व तूर उत्पादक शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट झाल्याने सध्या शेतकरी चिंतेत आहे. खरीप हंगाम हातातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे. आर्वी तालुक्याचे ४७, ९९२ हेक्टर पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली तर ४० हजार हेक्टरचे क्षेत्र कोरडवाहू क्षेत्र आहे. तालुक्यात ३ हजार ७७९ विहिरी असून मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू क्षेत्र असल्याने याचा मोठा फटका सोयाबीन उत्पादकांना व त्या पाठोपाठ कपाशी, तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसणार असल्याचे एकूण चित्र आहे.
२८ दिवसापांसून पाऊस बेपत्ता
By admin | Published: September 01, 2016 2:05 AM