वर्धा : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी पहाटेपासून सर्वत्र कोसळधार असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे जलाशयांच्या पाणीपातळी वाढ झाल्याने पाण्याचा विसर्गही सुरू झाला आहे. परिणामी नदी-नाल्यांना पूर आल्याने जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली असून, सकाळपासूनच धो-धो बरसायला लागला आहे. यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची कामेही थांबली आहे. बऱ्याच भागात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. तसेच शेतशिवारही या पुराच्या पाण्याने खरडून जाण्याच्या स्थितीत आहे. हिंगणघाट तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस असल्याने या तालुक्यातील बऱ्याच भागातील गावांचा संपर्क तुटला. पोहणा, ढिवरी-पिपरी, कुंभी-सातेफळ, अलमडोह-अल्लीपूर या मार्गावरून पाणी वाहून जात असल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. याशिवाय सास्ती, कोसुर्ला व भैयापूर शिवारातही पाणी शिरल्याने परिसर जलमय झाला आहे.
उर्ध्व वर्धानंतर निम्नतूनही सोडले पाणी
उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने ९३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने शुक्रवारी सायंकाळी या प्रकल्पाच्या सात दरवाजांतून ५० से.मी. पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यातील पाणी निम्न वर्धा प्रकल्पात येत असल्याने याही प्रकल्पातील पाणीसाठा वाढायला लागल्याने रात्री साडेआठ वाजता या प्रकल्पाची १३ दरवाजे उघडण्यात आली. यातून ३३७.२ घनमीटर पाणी वर्धा नदीपात्रात सोडण्यात आले. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
लाल नाला प्रकपाचे पाच गेट उघडले
कोरा : या परिसरात पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात पाऊस असल्याने येथील लाल नाला प्रकल्प शत-प्रतिशत भरले आहे. परिणामी या प्रकल्पाच्या पाच गेटमधून पाच सेंटिमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला. आज कोरा येथे आठवडी बाजार असल्याने सर्वत्र दाणादाण झाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चापापूरला जाण्याकरिता दोन नाले ओलांडून जावे लागतात. या नाल्यावरील पुलांची उंची फारच कमी असल्याने पूर आला की मोठी पंचाईत होते. आजही शेतकरी व नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तीन वर्षांपूर्वी शेतकरी व मजूर या पुलावरून वाहून गेले होते. सुदैवाने दोघेही बचावले; परंतु या पुलाची उंची वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोहरा परिसरातील शेतशिवार झाले जलमय
पोहणा : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. अनेक शेतकऱ्यांची पिके खरडून गेली आहे. पुलावरून पाणी असल्याने वेणी, बोपापूर व हिवरा या गावाला जोडणारे मार्ग बंद पडले. गावातील नाल्यांची स्वच्छता केली नसल्याने नाल्यातील पाणी रस्त्यांवरून वाहायला लागले. त्यामुळे बोपापूर येथील नवीन वसाहतीमध्ये अनेकांच्या घरांत पाणी शिरले. कूपनलिका पाण्याखाली आल्याने गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत आहे.