शेतकऱ्यांवर आर्थिक संकट : पेरणीनंतर शेत गेले खरडून लोकमत न्यूज नेटवर्क घोराड : पुलाचे बांधकाम चुकीचे करण्यात आल्याने याचा फटका शेतकऱ्याला बसला आहे. शेतात पावसाचे पाणी शिरल्याने पाच एकरात केलेली पेरणी खरडून गेली. जेमतेम परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांवर यामुळे आर्थिक संकट कोसळले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. नजीकच्या मौजा बिबी शिवारात तानबाजी भांदककर यांच्या नावे पाच एकर शेत आहे. त्यांचे दोन्ही मुले शेतीच करतात. प्रत्येकाने अडीच एकरात पेरणी केली. गुलाब भांदककर यांनी सोयाबीन तर नागो भांदककर यांनी कपाशीची लावण केली होती. सोमवार व मंगळवारला आलेल्या पावसाने परिसरातील नाले तुडूंब भरून वाहिले. नाल्याचे पाणी भांदककर यांच्या शेतात शिरल्याने त्यांक्गी पेरणी यात खरडून गेली. घोराड-बीबी रस्त्याचे खडीकरण व बांधकाम सुरू आहे. या कामात रस्त्यावर टाकण्याकरिता सिमेंट पायल्याचा वापर करण्यात आला. रस्त्यावर बांधलेल्या पुलातून पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. पाणी ओसरल्यावर बियाण्याला फुटलेले अंकुर व शेतातील माती खरडून गेली. यामुळे या दोन्ही भांवडावर ऐन खरीप हंगामात आर्थिक संकट कोसळले आहे. रोजमजूरी करुन शेतात पेरणी केली; पण होत्याचे नव्हते झाल्याने ते हतबल झाले आहे. या शेतकऱ्यांनी तलाठी व तहसिलदार यांच्याकडे मदतीसाठी अर्ज केला आहे. असे असले तरी शेताच्या बांधावर जाण्याची तसदी महसूल विभागाने शुक्रवारपर्यंत दाखविली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासनाकडून काही लाभ मिळेल काय याबाबत साशंकता आहे. शेतकऱ्यांना मदत मिळते काय याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
पुलाच्या बांधकामामुळे शेतात शिरले पावसाचे पाणी
By admin | Published: July 01, 2017 12:37 AM