वर्धा : स्थानिक राजपूत चेतना मंच यांच्यावतीने घेण्यात आलेल्या चर्चासत्र व समाज मेळाव्यात गुणवंतांना सन्मानित केले. येथील महाराणा प्रताप शाळेतील प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विजयसिंह चंदेल, माजी नगराध्यक्ष संतोषसिंह ठाकूर, डॉ. रंभा सोनाये यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना चंदेल यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच प्रताप यांनी राजपूतांना एकजुट होण्याचे आवाहन केले होते असे सांगितले. प्रा. परिहार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी दक्षिणेत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यश मिळविले. मात्र राजस्थानात महाराणा यांना ते यश मिळविता आले नाही. कारण राजपूत समाज एकसंघ नव्हता म्हणून त्यांनी एकतेची अपेक्षा केली. यानंतर बोलताना डॉ. रंभा सोनाये यांनी मध्ययुगातील राजपूत स्त्रीयांच्या योगदानावर भाष्य करताना त्यांच्यातील स्वाभीमान आणि राजपूत महिलांनी त्याकाळात केलेली एकजुट याची माहिती दिली. तर संतोषसिंह ठाकूर यांनी महाराणा प्रतापसिंह आणि राजपूत सरदारांनी मुगलविरोधी भूमिका घेवून संपूर्ण भारत जिंकण्याचे स्वप्न साकार होवू दिले नाही. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे रक्षण झाले असल्याचे सांगितले. राजपूत समाजाला शिक्षित व आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या मुलामुलींचे विवाह करण्यासाठी राजपूत मंचाने कार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी समाज मेळाव्यात केले. डॉ. रघविरसिंह दिदावत, डॉ. वीरेंद्रसिंह बैस, सचिव उदयसिंह सेंगर, भुपेन्द्रसिंह बघेल यांनी विचार मांडले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विरेद्रसिंह, महेंद्रसिंह चौहाण, भगवानसिंह चंदेल, प्रतापसिंह बैस, किर्ती बैस आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)
मध्ययुगातील राजपूत स्त्रियांचे योगदान
By admin | Published: May 27, 2015 1:59 AM