श्रीमंत माने / अभिनय खोपडे
नागपूर / वर्धा : वर्धेचे खासदार रामदास तडस यांना दुर्मिळ हॅट्ट्रिक खुणावतेय, तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना रोखण्याचे मनसुबे रचणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र तगडा उमेदवार स्थानिक असावा की बाहेरचा, हा पेच सोडवावा लागणार आहे.
खासदार रामदास तडस महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे वर्धालोकसभा मतदारसंघ त्यांच्या दृष्टीने आखाडाच आहे. ते तिसऱ्यांदा लढतीत उतरतील, असे मानले जाते. तिकिटाच्या स्पर्धेत अन्य कोणी नाही. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व मोर्शी आणि वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा अशा सहा विधानसभांपैकी प्रताप अडसड (धामणगाव), दादाराव केचे (आर्वी), समीर कुणावार (हिंगणघाट) व पंकज भोयर (वर्धा) हे चार आमदार भाजपचे आहेत. तांत्रिकदृष्ट्या मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार हे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचे असले तरी प्रत्यक्षात अपक्षच आहेत. देवळीचे रणजित कांबळे हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत.
पक्षाची ही मजबूत स्थिती व जातीय समीकरणे यामुळे तडस यांना खासदारकीची हॅट्ट्रिक खुणावतेय. कमलनयन बजाज (१९५७, ६२ व ६७) आणि वसंत साठे (१९८०, ८४ व ८९) यांनी या मतदारसंघात यापूर्वी अशी हॅट्ट्रिक नोंदवली आहे. याउलट, महाविकास आघाडीला उमेदवाराच्या निवडीचा पेच सोडवावा लागेल. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नागपूरचे सुनील केदार यांच्याकडे होते. त्यामुळे ते वर्धेतून लढतील, असा कयास लावला जात होता.
हा मतदारसंघ परंपरेने काँग्रेसचा असल्याने, गेल्या दोन्हीवेळेस अनुक्रमे सागर मेघे व चारुलता टोकस हे तडस यांच्याविरुद्ध लढल्यामुळे काँग्रेसनेच या जागेवर हक्क सांगितला आहे. तथापि, तडस यांना रोखू शकेल असा तगडा स्थानिक उमेदवार काँग्रेसकडे नाही. मेघे कुटुंब यावेळीही लोकसभेच्या रिंगणात नसेल. चारुलता टोकस पुन्हा उमेदवारीची मागणी करू शकतात. आर्वीच माजी आमदार अमर काळे यांनी लढावे, असे काहींचे म्हणणे आहे. तथापि, ते लोकसभा लढले तर आर्वीतून त्यांच्या पत्नींना उतरवावे लागेल. राष्ट्रवादीकडे माजी आमदार, सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांच्या रूपाने उमेदवार आहे. रामटेकचे माजी खासदार सुबोध मोहिते यांनीही प्रयत्न चालवले आहेत. अर्थात, बाहेरचे म्हणून त्यांना पक्षातूनच विरोध आहे. त्याशिवाय, भंडारा-गोंदिया व बुलढाणा यासोबत तिसरी जागा देण्याइतकी राष्ट्रवादीची विदर्भात ताकद नाही.
वर्धा लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघनिहाय मते : मतदारसंघनिहाय मते : २०१९ :: २०१४
रामदास तडस - चारुलता टोकस : रामदास तडस - सागर मेघे
धामणगाव रेल्वे - ९४,४६९ - ७५,४८५ : ८९,८५५ - ६४,४३४
मोर्शी - १,०६,४५० - ५७,७६१ : १,००,९८२ - ४९,१११
आर्वी - ९१,०६५ - ६४,८२८ : ७७,६२३ - ६२,२८३
देवळी - ८५,३०० - ६८,५०० : ८१,८२२ - ५१,२९६
हिंगणघाट - १,०३,६१० - ६५,३३२ : १,०१,२०५ - ४५,१९४
वर्धा - ९४,५९४ - ५७,३३७ : ८५,२९१ - ४९,०१२
पोस्टल - २८७६ - १९३० : ७४० - ४०५
एकूण - ५,७८,३६४ - ३,९१,१७३ : ५,३७,५१८ - ३,२१,७३५
२०१४च्या निवडणुकीत बसपाचे चेतन पेंदाम यांनी ९० हजार ८६६ मते घेतली, तर २०१९च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे धनराज वंजारी यांना ३६ हजार ४५२ आणि बसपाचे शैलेश अग्रवाल यांना ३६ हजार ४२३ मते मिळाली.