दीड लाखाचे नुकसान : भरपाई देण्यास वनविभागाकडून टाळाटाळ समुद्रपूर : रानडुकरांनी शेतातील डाळींबाची बाग उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्याचे १ लाख ६० हजार रूपयांचे नुकसान झाले. आधीच शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून नापिकीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत लाखो रूपये खर्च करून जगविलेली डाळींबाची बाग वन्यप्राण्यांनी नष्ट केल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. परिसरातील शेडगाव, दहेगाव, जाम, हिरडी, वडगाव, पारडा, मांगली, शिर्सी शिवारात रोही व डुकरांच्या कळपांनी हैदोस घातला आहे. वन्यप्राणी पिकांचे नुकसान करीत आहे. कुंपण लावून तयार केलेल्या बागाही उद्ध्वस्त होत आहे. वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांवर हल्लेसुद्धा केले आहे. याबाबत शेतकरी वनविभागाकडे तक्रार घेऊन गेल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले जाते आहे. शेतकरी मंगेश शंकरराव सुपारे यांनी नांदी फाउंडेशनच्या मदतीने दोन एकरांत डाळींबाची लागवड केली. यासाठी त्यांना आतापर्यंत प्रतीझाड चार ते पाच हजार रूपये खर्च आला. त्यातील ४० झाडे रानडुकरांनी मुळासह उपटून उद्ध्वस्त केली. याबाबत त्यांनी समुद्रपूर वनविभाग कार्यालयात तक्रार केली. परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता तुम्ही नांदी फाउंडेशनकडून झाडांची लागवड केली, त्याचे प्रमाणपत्र आणा असे म्हनात परत पाठविले. शेतकऱ्याने प्रमाणपत्र नेल्यानंतर कागदपत्रांची गरज नव्हती, असे म्हणून आता चार ते पाच दिवसांचा कालावधी लोटला आहे. तुमची तक्रार दाखल होऊ शकत नसल्याचे सांगत बोळवण केली. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यानंतरही वनविभाग दखल घेत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. शेतकरी सुपारे यांचे १ लाख ६० रूपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
रानडुकरांनी केली डाळिंबाची बाग उद्ध्वस्त
By admin | Published: August 15, 2016 1:10 AM