लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी हा राज्य परिवहन महामंडळासाठी व्यावसायिक हंगामच असतो. पण ऐन दिवाळीपूर्वी रापमच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसल्याने आणि मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात रामपच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असल्याने जिल्ह्यातील पाचही आगारांमध्ये बसेस उभ्या आहेत. परिणामी, आतापर्यंत रापमला १.७८ कोटींचा फटका बसला आहे.लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजचे औचित्य साधून अनेक व्यक्ती आपल्या मूळ गावी परततात. दिवाळी उत्साहात साजरी केल्यावर ते आपल्या नियोजित ठिकाणी जात असल्याने या दिवसांत रापमला प्रवासीही जादा मिळतात. अनेक व्यक्ती खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला दुय्यम स्थान देऊन रापमच्या प्रवासी वाहतूक सुरक्षित आहे, असे म्हणत रापमच्या बसनेच ये-जा करतात; पण मागील आठ दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील रापमच्या प्रवासी वाहतुकीला ब्रेक लागला आहे. बसेसच बंद असल्याने रापमला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.
या मागण्यांसाठी सुरू आहे आंदोलन- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्यात यावे.- राज्य परिवहन महामंडळाचा अर्थसंकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावा.- एसटी कामगारांना समान काम-समान दाम या तत्त्वावर किमान वेतन कायद्यानुसार १ एप्रिल २०१६ पासून १८ हजार रुपये मूळ वेतन देण्यात यावे.- सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाजेष्ठतेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
दररोज ८०० बस फेऱ्यांचे नियोजन- जिल्ह्यातील रापमच्या पाच आगारांमध्ये एकूण २२० बसेस आहेत. या बसेसच्या जोरावर पाचही आगारांमधून दररोज सुमारे ८०० बस फेऱ्यांचे नियोजन केले जाते; पण कामबंद आंदोलनामुळे रापमचे हे सर्व नियोजन कोलमडले आहे.
मालवाहतुकीवरही परिणाम- कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान रापमकडून मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. या मालवाहतुकीच्या माध्यमातून मोठी मिळकतही रापमला मिळत असली तरी मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मालवाहतूक करणारी वाहनेही सध्या रापमच्या आगारांमध्ये उभ्या आहेत. एकूणच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रापमच्या मालवाहतुकीवरही परिणाम झाला आहे.दररोज २३ लाखांची मिळकत- रापमच्या पाच आगारांमधून दररोज सुमारे ८०० बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात येत असून २२ लाखांची प्रतिदिवशी मिळकत होते. तर हंगामात ही मिळत किमान ३५ लाखांवर जात असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी मागील आठ दिवसांपासून रापमच्या वर्धा विभागाला कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे तोटाच सहन करावा लागत आहे.
रामपच्या वर्धा विभागाला दररोज २३ लाखांची मिळकत राहत असून हंगामात ती किमान २३ लाखांवर पोहोचते. पण मागील आठ दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने रापमला किमान १.७६ कोटींचा आर्थिक फटका बसला आहे.- विजय घायडे, विभागीय वाहतूक अधिकारी, रापम, वर्धा