जिल्हा न्यायालयाचा निर्वाळा : दहा हजार रूपये दंडवर्धा : एका १४ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रवी अनिल मांडवकर (१९), रा. वाघोली, ता. हिंगणघाट याला सात वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल येथील तदर्थ अति. सत्र व विशेष सत्र न्यायाधीश अंजली खडसे यांनी गुरुवारी दिला. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, २३ जानेवारी २०१३ रोजी सायंकाळी रवी मांडवकर याने पीडिताला घरी नेत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी पीडिताची आई घरी आल्यावर तिने झालेल्या प्रकाराची माहिती दिली. यावरून पीडिताच्या आईने हिंगणघाट पोलिसात रवी मांडवकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक पी.जे. बावणकर यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले.सदर प्रकरणात प्रारंभी तत्कालीन सहायक सरकारी अभियोक्ता अर्चना वानखेडे यांनी काही साक्षदार तपासले. त्यानंतर सहायक सरकारी अभियोक्ता अमोल कोटंबकर यांनी उर्वरित साक्षदार तपासले व युक्तीवाद केला. यावरून न्यायाधीश खडसे यांनी रवी मांडवकर याला भादंविच्या कलम ५११ व १८ मुलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा २०१२ अन्वये सात वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची व दंड न भरल्यास एक वर्षे अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.(प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास
By admin | Published: March 10, 2017 12:58 AM