वर्धा: सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प विविध प्राणी आणि जैवविविधतेकरिता प्रसिद्ध आहे. आता यामध्ये दुर्मिळ असलेल्या ल्युसिस्टिक अस्वलाने भर घातली आहे. यामुळे आता वन्यप्रेमी, पर्यटक आणि अभ्यासकांसाठी ही आनंदवार्ता ठरली आहे.
बोर व्याघ्र प्रकल्प १३८.१२ चौरस किलोमीटरमध्ये विस्तारलेले आहे. महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचा आणि महत्त्वाचा हा व्याघ्र प्रकल्प आहे. वनसंपदा मोठ्या प्रमाणात असल्याने येथे वाघ, बिबट, अस्वल, रानडुकरे, सांबर, चितळ, रोही यासह इतरही वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. वन्यप्राण्यांसह पक्ष्यांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे या जंगलामध्ये फेरफटका मारण्यासाठी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाघांचेही अलगद दर्शन होत असल्याचे पर्यटक सांगतात. या प्रकल्पामध्ये १०० पेक्षा अधिक काळ्या रंगाच्या अस्वलीचा अधिवास आहे. अशातच येथे १९ मे २०२२ रोजी फिकट तपकिरी रंगाचे दुर्मिळ ‘ल्युसिस्टिक स्लॉथ बिअर’ आढळून आल्याने या प्रकल्पात ही फार मोठी उपलब्धी झाली आहे. महाराष्ट्रामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पानंतर दुसऱ्यांदा बोरमध्ये तपकिरी कोट असलेले दुर्मिळ अस्वल आढळून आल्याचे सांगितले जात आहे.
गुजरातमध्येही आढळले होत अस्वल
सन २०१६ मध्ये याच प्रकारचे अस्वल गुजरात राज्यातील दाहोदच्या जंगलात आढळून आले होते. त्यानंतर ३ एप्रिल २०२० मध्ये पांढरे कोट असलेले अडीच ते तीन वर्षाचे ‘ल्युसिस्टिक अस्वल’ प्रथम आढळून आले. बोर व्याघ्र प्रकल्पात प्रथमच दुर्मिळ ल्युसिस्टिक वन्यप्राणी अस्वल आढळून आल्याने वन्यजीव अभ्यासक प्रेमींमध्ये अस्वल पाहण्याची ओढ लागलेली आहे.
ल्युसिस्टिक म्हणजे काय?
त्वचेतील रंगद्रव्ये अंशत: नष्ट झालेल्या व ल्युसिझम या विकाराने ग्रस्त असलेल्या प्राण्यास ल्युसिस्टिक प्राणी म्हणतात. ल्युसिस्टिक ही दुर्मिळ अवस्था असून मेलेनीनची किमान आंशिक अनुपस्थिती असते. त्यामुळे प्राण्यांच्या त्वचेतील रंगद्रव्यांचे नुकसान होते. त्यांचे त्वचा, केस, पंख किंवा खवले यांचा रंग पांढरा किंवा फिकट होतो. यात प्राण्यांच्या डोळ्यांवर या विकिराचा परिणाम होत नाही. असे प्राणी क्रोमॅटोफोर दोषांमुळे पांढरे किंवा फिकट रंगाचे दिसतात. आपल्या बोर व्याघ्र प्रकल्पात आढळून आलेला पहिला प्राणी आहे, अशी माहिती पीपल्स फॉर ॲनिमल्सचे आकस्मिक सेवा प्रभारी कौस्तुभ गावंडे यांनी दिली.
जंगलातून जाणाऱ्या आमगाव रस्त्याने मोटारसायकलने जात असताना सायंकाळी एक प्राणी रोडवर दिसून आला. बारकाईने पाहिले असता नेहमी आढळणाऱ्या काळ्या अस्वलापेक्षा वेगळा असल्याचे दिसून आले. ते ल्युसिस्टिक दुर्मिळ असल्याचे लक्षात आले. १३ मार्च २०२० मध्ये शुभम पाटील या पर्यटकाला हे अस्वल आपल्या आईसोबत दिसून आले. तेव्हा ते ३ ते ४ महिन्याचे असावे. ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये मादी अस्वल दोन पिलांना पाठीवर घेऊन फिरतानाचे फोटो दिसून आले. यात एक काळ्या रंगाचे तर दुसरे तपकिरी रंगाचे होते. आता त्या अस्वलाचे वय अडीच वर्ष असावे. अस्वलांचा समागमनाचा कालावधी उन्हाळा असतो. साधारपणे डिसेंबर, जानेवारीत यांचा जन्म झाला असावा. हे अस्वल नर की मादी हे सध्यातरी सांगणे कठीण आहे.
मनेशकुमार सज्जन, वनरक्षक, बोर व्याघ्र प्रकल्प, बोरधरण.
-----------------------------------------------------------------------------