शिकाऱ्यांचे लक्ष : संकटग्रस्त प्रजातींच्या ‘रेड लिस्ट’मध्ये नोंदवर्धा : महागडे पर्फ्यूम बनविण्याकरिता उपयोगी पडणारे दुर्मिळ कस्तुरी मांजर वर्धा जिल्ह्यातील इंझाळा या गावात आढळले. या मांजराची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याने तिची संकटग्रस्त प्रजातीच्या ‘रेड लिस्ट’मध्ये नोंद असल्याची माहिती पीपल्स फॉर अॅनिमल या संघटनेने दिली. इंझाळा या गावातून पीपल्स फॉर अॅनिमलचे कौस्तुभ गावंडे यांना विहिरीत रान मांजर पडून असल्याची माहिती पंकज गाडगे यांनी दूरध्वनीवरून दिली. या आधारे गावंडे आपल्या सहकारी इंझाळा गावात पाहोचले. त्यांनी या प्राण्याची पाहणी केली असता ती रानमांजर नसून दुर्मिळ कस्तुरी मांजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावरून कौस्तुभ गावंडे व त्याचे सहकारी अजिंक्य काळे यांनी २० ते २५ फुट खोल विहिरीत उतरुन सुमारे अर्ध्या तासांच्या अथक परिश्रमानंतर या मांजरीला सुखरूप बाहेर काढले. या मांजरीला मराठीत ‘कस्तुरी मांजर’ किंवा ‘जोवाडी मांजर’ असे म्हणतात. तसेच इंग्रजीमध्ये ‘इंडियन स्मॉल सीविट कॅट’ असे म्हणतात. ही मांजर वेगवेगळ्या औषधी व परर्फ्यूम बनविण्याकरिता उपयोगी पडत असल्याने तिची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते. या प्राण्याच्या कातड्याची मोठ्या प्रमाणात तस्करीसुद्धा केली जात असल्याची माहिती पीपल्स फॉर अॅनिमलने दिली. यामुळे या प्राण्याला इंटरनॅशनल युनियन आॅफ नेचर कन्सर्रवेशन (आईयूसीएन) ने संकटग्रस्त प्रजातींच्या ‘रेडलिस्ट’मध्ये समाविष्ट केले आहे. यावेळी पीपल फॉर एनिमल्सचे सुमित जैन यांची उपस्थित होते.(प्रतिनिधी) वर्धेत पहिलीच नोंद सतत दोन दिवस विहिरीत राहिल्याने व अतिथंडी तसेच खायला काही न मिळाल्यामुळे या मांजराची प्रकृती खालावलेली असल्याचे पिपल्स फॉर एनिमल्सचे पशुवैद्यकीय अधिकारी संदीप जोगे यांनी सांगितले. पूर्णपणे प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे पिपल्स फॉर अॅनिमलच्यावतीने सांगण्यात आले आहे.
वर्धेत आढळले दुर्मिळ कस्तुरी मांजर
By admin | Published: January 13, 2017 1:16 AM