डॉक्टर व्हायचेच : हलाखीच्या परिस्थितीवर अशीही मात महेश सायखेडे वर्धा इच्छाशक्ती असली की ध्येय गाठताना येणाऱ्या अडचणी खुज्या वाटू लागतात. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर गगणाला गवसणी घालण्याची अनेक उदाहरणे आहेत. हीच इच्छाशक्ती आणि जिद्द हर्षदा घुगे ही दहावीची परीक्षार्थी बाळगून आहे. आई-वडिलाला मदत म्हणून ती परीक्षा सुरू असतानाही रसवंतीवर हातभार लावत आहे आणि तिथेच रसवंतीच्या वाहनाच्या सीटवर बसून परीक्षेचा अभ्यासही करताना दिसते. तिची ही जिद्द कौतुकास पात्र असली तरी अभ्यासासाठी सुख-सोईची गरज नाही, असा संदेशही ती यातून देत आहे. एकेविसाव्या शतकात समाजातील एक घटक आपल्या पाल्याची प्रत्येक आवड-निवड व इच्छा पूर्ण करताना दिसतात. तर समाजातील एका घटकाला आपल्या पाल्याचे साधे शिक्षणही पूर्ण करण्यासाठी तारेवची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. आर्थिक स्थिती हलाखीची असलेल्या एका दाम्पत्याने शहरातील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला मालवाहूवर रसवंती थाटली. याच दुकानात आई-वडिलांना हातभार लावत डॉक्टरकीचे स्वप्न उराशी बाळगून असलेली हर्षदा तिथेच अभ्यास करून यंदा दहावीची परीक्षा देत आहे. वर्धा तालुक्यातील महाकाळ येथील मुळ रहिवासी असलेल्या रामकृष्ण घुगे यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. पाच भाऊ असल्याने रामकृष्ण यांच्या वाट्याला एक एकर शेती आली. इतक्यात भागत नसल्याने मुलांच्या शिक्षणासाठी कामाच्या शोधात त्यांनी पत्नी, मुलगी व मुलासह वर्धा गाठले. सध्या ते आलोडी भागातील अंजना माता मंदिर परिसरात राहत आहेत. कुटुंबीयांचे पालन-पोषण करण्यासाठी गत सहा वर्षांपासून त्यांनी येथील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर रसवंती थाटून कसाबसा उदरनिर्वाह करीत आहे. कला शाखेची पदवी घेतलेल्या रामकृष्ण यांना त्यांच्या कामात पत्नी माया घरचे संपूर्ण कामे पूर्ण करून हातभार लावत आहे. माया यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. रामकृष्ण व माया यांना दोन अपत्य असून मुलगा आठवीत शिकत आहे. आई-वडिल दिवसभर राबतात. ही बाब हर्षदाला अस्वस्थ करते. दहावीची परीक्षा सुरु असतानाही ती त्यांना हातभार लावत आहे. मालवाहूवर असलेल्या रसवंतीवरच ती सवड मिळेल तसा अभ्यास करते. तिचे आई-वडिलही तिचा अभ्यास पूर्ण करुन घेतात. हर्षदाला डॉक्टर व्हायचे आहे. परिस्थिती कशीही असली तरी डॉक्टर होण्यासाठी डॉक्टरच्याच घरी जन्माला आले पाहिजे, असे काही नाही ही जाणिव असल्यामुळे तिला स्वत:वर विश्वास असल्याचे ती सांगते. घरच्या शेतातील ऊस रामकृष्ण त्यांच्या रसवंतीवर बाहेरून आणलेला ऊस न वापरता स्वत:च्या शेतातीलच ऊ वापरत आहेत. दिवसाला जवळपास दोन हजार रुपये त्यांच्या हाती येतात. हा व्यवसाय उन्हाळ्यापूरता असतो. याबळावर उपजीविका सुरू आहे. जोडीला इतरांची शेती भाड्यावर घेऊन त्यात उत्पन्न घेतले जात असल्याचेही रामकृष्ण घुगे सांगतात.