वर्धा : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त धान्य वाटपासह एक शासकीय दस्तावेज म्हणून शिधापत्रिकेकडे पाहिले जाते़ गत कित्येक वर्षांपासून या शिधापत्रिका पुस्तक रूपात उपलब्ध आहेत़ आता त्यांचे डिजीटलायझेशन होणार आहे़ यासाठी पुरवठा विभागाकडून मोहीम राबविली जात असून जिल्ह्यातील २ लाख ८० हजार शिधापत्रिका डिजीटल होणार आहेत़केंद्र व राज्य शासनाकडून शिधापत्रिकांच्या नुतनीकरणाऐवजी ते डिजीटल करण्यावर भर दिला जात आहे़ रेशन कार्ड हे नागरिकांकडील महत्त्वाचे दस्तावेज म्हणून समोर आले आहे़ ते खराब होऊ नये, तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांना पुस्तके वापरावी लागू नये, शासन, प्रशासनालाही ते तपासताना अधिक त्रास होऊ नये म्हणून शासनाने संपूर्ण शिधापत्रिका डिजीटल करण्याचा निर्णय घेतला आहे़ या कामाला प्रारंभही करण्यात आलेला आहे़ वर्धा जिल्ह्यात अंत्योदय गटातील ४३ हजार २३९ शिधापत्रिका धारक आहेत़ बीपीएल गटातील केशरी कार्डधारक ८१ हजार ३३८ तर प्राधान्य गटातील १ लाख ५५ हजार ८६१ कार्डधारक आहेत़ जिल्ह्यातील या सर्व शिधापत्रिकांचे डिजीटलायझेशन करण्यात येणार आहे़ यासाठी पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांकडे अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे़ आधार कार्डप्रमाणेच रेशनकार्डही तयार होणार असल्याने त्यात बँक खाते क्रमांकासह संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे़ या संपूर्ण प्रक्रियेनंतर तयार झालेले स्मार्ट कार्ड तंत्रज्ञान युगात विविध कामांकरिता उपयोगी ठरणार आहे़ सध्या रेशन कार्डची सत्यप्रत कुठल्याही शासकीय कामाकरिता मागितली जाते़ यानंतर स्मार्ट कार्ड असल्यास त्याचा व आधार क्रमांक संगणकात नोंदविल्यास त्या कुटुंबाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे़ शासनाच्यावतीने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानावर बायोमॅट्रीक यंत्र बसविण्यात येणार आहे़ या यंत्रामध्ये सदर कार्ड स्वाईप केल्यास त्यावरील धान्याची उचल झाली वा नाही, त्यांना धान्य मिळू शकते वा नाही याबाबतही लगेच माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे़ रेशन कार्ड डिजीटल करण्यासाठी माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे़ सध्या पुरवठा विभाग या कामाकडे ‘मिशन’ म्हणून पाहत आहे़ यामध्ये कुटुंबातील प्रमुख महिलेचा फोटो, कुटुंबातील किमान एका व्यक्तीचा प्रामुख्याने महिलेचा बँक खाते क्रमांक गोळा केला जात आहे़ ही संपूर्ण माहिती त्या कार्डमध्ये अंतर्भूत करण्यात येणार आहे़ एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण माहिती गोळा करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)
शिधापत्रिका होणार डिजिटल
By admin | Published: April 10, 2015 1:47 AM