लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये देण्यात आलेल्या हिपेटायटीस बी या इंजेक्शनमुळे दहा विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडल्याने लगेच त्यांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील नऊ विद्यार्थिनींवर उपचार करुन सुटी देण्यात आली. तर एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.श्रीमती राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगच्या बी. एस. सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना शनिवारी दुपारच्या सुमारास परिचारिकांच्या हाताने इंजक्शन देण्यात आले. यावेळी जवळपास अठारा ते वीस विद्यार्थिनींना इंजक्शन दिल्यानंतर त्यापैकी दहा विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. त्यांना डोके जड आल्यासारखे, गरगरल्या सारखे वाटू लागले. तर एक विद्यार्थिनी चक्कर येऊन खाली पडली. या सर्व दहाही विद्यार्थिनींना तात्काळ आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर नऊ विद्यार्थिनींची प्रकृती सुधारल्यावर सुटी देण्यात आली. यातील एक विद्यार्थिनी गंभीर असल्याने तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रकृती गंभीर असलेल्या विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरु असून नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या मांडला आहे. यासंदर्भात नातेवाईक व विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर कसले दडपण तर नाही ना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना देतात इंजेक्शनसावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात कार्यरत असलेले कर्मचारी तसेच येथील मेडिकल कॉलेज व नर्सिग कॉलेजचे विद्यार्थी हे रुग्णांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी हिपेटायटीस बी हे इंजक्शन दिले जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.नर्सिग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना हिपेटायटीस बी इंजक्शन देण्यात आले. त्यात दहा विद्यार्थ्यांना रियॅक्शन आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी एका विद्यार्थीनीला अॅनाफायलॅटीक्स रियॅक्शन आल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.- डॉ.चंद्रशेखर महाकाळकरमुख्य वैद्यकीय अधीक्षक, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय.
इंजेक्शनमुळे दहा विद्यार्थिनींना रिअॅक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 9:50 PM
सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे कॉलेज आॅफ नर्सिंगमध्ये देण्यात आलेल्या हिपेटायटीस बी या इंजेक्शनमुळे दहा विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडल्याने लगेच त्यांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ठळक मुद्देएक विद्यार्थिनी गंभीर : श्रीमती राधिकाबाई मेघे नर्सिंग कॉलेजमधील प्रकार