अविनाश सावजी : माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने निर्मित स्पंदन वसतिगृहातील कार्यक्रम हिंगणघाट : जलसंधारण करून बाहेरच्या पाण्याचा दुष्काळ संपविता येईल; पण डोळ्यातील पाण्याचा दुष्काळ संपविण्याची आज खरी गरज आहे. दुसऱ्यांच्या दु:खाने ज्या डोळ्यांत पाणी येते, तो खरा श्रीमंत असतो. अशाच व्यक्ती खऱ्या अर्थाने समाज घडवू शकतात, असे मत प्रयास सेवांकुरचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी व्यक्त केले. विद्यार्थी सहायक समिती वरोराच्या हिंगणघाट परिवारातर्फे उभारलेल्या स्पंदन वसतिगृहाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी तर अतिथी म्हणून आ. समीर कुणावार, विचारवंत डॉ. ब्रह्मदत्त पांडेय, पी.व्ही. टेक्सटाईल्सचे जामचे उपाध्यक्ष पारस मुणोत उपस्थित होते. डॉ. सावजी पूढे म्हणाले की, आज संवेदना ही बोथट होत चालली आहे. साने गुरूजी सारखे मातृहृदयी मन आज निर्माण होण्याची नितांत गरज आहे. यामुळे समाजमन अधिक निकोप होईल. मुलांवर शिक्षणाचे ओझे न टाकता त्यांना मुक्तपणे उमलू द्या व वेडी स्वप्ने त्यांना बघू द्या. नाही तर ती त्यांना पाहायला शिकवा. कारण, वेडी माणसेच इतिहास निर्माण करतात. त्यातूनच क्रांतीची बीजे तयार होत असतात, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अमृत लोणारे यांनी केले. हिंगणघाट येथील माजी शालेय विद्यार्थ्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीच्या भरवशावर स्पंदन जीवन विकास केंद्र हिंगणघाटकरिता ४००० चौरस फुट जागेवर तीन मजली प्रशस्त इमारत निर्माण करण्यात आली आहे. याच इमारतीमध्ये तिसऱ्या माळ्यावर पी.व्ही. टेक्सटाईल्स जामच्या सहकार्याने ३००० चौरस फुटाचे प्रशस्त सभागृह पुर्णत्वास नेण्यात आल्याची माहितीही याप्रसंगी देण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थी सहाय्य समिती वरोराचे अध्यक्ष तथा संस्थापक सचिव प्रा. मधुकर उपलेंचवार यांच्या सेवाकार्याचा विशेष रूपाने उल्लेख करण्यात आला. याप्रसंगी आ. कुणावार, डॉ. पांडेय, नगराध्यक्ष बसंतानी यांनीही मार्गदर्शन केले. समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक ४हिंगणघाट - शहरातील पर्यावरण संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. अविनाश सावजी यांची भेट घेतली. शहरात पर्यावरण संवर्धन संस्थेने अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबविले आहेत. त्या उपक्रमांची माहिती जाणून घेत डॉ. सावजी यांनी संस्थेचे कौतुक केले. शिवाय पर्यावरणावर आधारित कार्यशाळेला उपस्थित राहण्याची ग्वाहीदेखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. ४आपण स्वत:वर आधी प्रेम करू लागलो की, इतरांवर प्रेम करता येऊ शकते. सर्वात आधी आपल्या मनात सेवेचा भाव जागृत झाला पाहिजे, तेव्हाच आपण माणसावर प्रेम करू लागतो, असे मतही डॉ. सावजी यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. शहरात आणि ग्रामीण भागात प्लास्टिक वाढत आहे. यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी संस्थेने ठोस कार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात. यावेळी संस्थेचे आशिष भोयर, अभिजीत डाखोरे, राजेंद्र कोंडावार, प्रदीप गिरडे, रमेश झाडे यांच्यासह मार्गदर्शक प्रा अमृत लोणारे, प्रा.डॉ. शरद कुहिकर, शरद कारामोरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
दुसऱ्यांच्या दु:खाने डोळ्यांत पाणी येणारा खरा श्रीमंत
By admin | Published: February 01, 2017 1:20 AM