लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा विषाणू सर्वत्र पाय पसरत असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करुन कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न चालविले आहे. परिणामी आजपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळला नाही. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून तीन टप्प्यात नऊ जणांचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचाच अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण, अजुनही कोरोनाचे संकट कायम असून नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता काळजी घेणे हाच त्यावर उपाय आहे. प्रशासनाला सर्व नागरिकांनी सहकार्य केल्यास या संकटातून सुखरुप बाहेर पडता येईल.जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या नागपूर व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने वेळीच सावधगिरी बाळगून उपाययोजना सुरु केल्या. सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यासह शाळा, महाविद्यालये बंद करुन प्रारंभी आपत्कालीन परिस्थिती घोषीत केली. त्यानंतर रविवारी एक दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’ लावण्यात आला. त्याला जनेतेनेही सर्वत्र उदंड प्रतिसाद दिला. मात्र, दुसऱ्या दिवशीच पुन्हा नागरिकांनी घराबाहेर पडून बेजबाबदारपणाचे दर्शन घडविले.या आजाराला सहज न घेता सजग राहण्याचे आवाहन होत असतानाही नागरिकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे विषाणूला खतपाणी मिळण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशासनाने संचारबंदी लागू केली.यासोबतच जिल्ह्याच्या सीमाही बंद केल्या आहे. आता कोरोना विषाणूचा कठीण काळ सुरु झाला असून या लढाईत जिंकण्यासाठी सर्वांनी धावण्याची नाही तर घरीच थांबण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग स्वत: चा जीव धोक्यात घालून सर्वांसाठी प्रयत्नरत असताना नागरिकांनीही आपल्या सहकार्याची साथ देण्याची गरज आहे. त्याकरिता प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.बाहेरगावावरुन आलेल्यांची घरोघरी जाऊन आरोग्य विभाग करतोय तपासणी- कोरोना बाधित क्षेत्रातूर्न जिल्ह्यात येणाºया प्रत्येक व्यक्तीवर प्रशासनाची करडी नजर आहे. आतापर्यंत कोरोना बाधित क्षेत्रातून १०९ व्यक्ती जिल्ह्यात आल्याची आरोग्य विभागाकडे नोंद आहे. त्यापैकी ७४ व्यक्तींची आतापर्यंत होम क्वारंटाईन मधून सुटका करण्यात आली. उर्वरित ३५ व्यक्ती सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पण, त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांच्यावर वैद्यकीय चमू लक्ष ठेऊन आहे. आरोग्य विभागाने प्रारंभी तीन, नंतर पाच, त्यानंतर एक असे एकूण ९ व्यक्तींचे नमुने तपासणीकरिता पाठविले होते. या सर्वांचेच नमुने निगेटिव्ह आले आहे.- यासोबतच जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबई यासह इतरही मोठ्या शहरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व नोकरी करणारे तरुण-तरुणी आपल्या गावाकडे परत आले आहे. त्यांची आकडेवारी ग्रामपंचायत सरपंच व पोलिस पाटलांकडून घेऊन आरोग्य सेविका व वैद्यकीय अधिकारी त्यांची तपासणी करीत आहे. त्यांच्यावर १४ दिवसापर्यंत लक्ष ठेऊन आहे.आतापर्यंत तीन टप्प्यात ९ व्यक्तींच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत आहे. त्यांनी सूचनांचे पालन करुन घराबाहेर न पडता घरातच आपला वेळ घालवावा.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.
अहवाल प्राप्त; बाधित नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 5:00 AM
आतापर्यंत आरोग्य विभागाकडून तीन टप्प्यात नऊ जणांचे रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचाच अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण, अजुनही कोरोनाचे संकट कायम असून नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता काळजी घेणे हाच त्यावर उपाय आहे. प्रशासनाला सर्व नागरिकांनी सहकार्य केल्यास या संकटातून सुखरुप बाहेर पडता येईल.
ठळक मुद्देप्रयोगशाळेत पाठविलेले नऊही अहवाल निगेटिव्ह : सतर्कता हाच या आजारावर एकमेव उपाय