व्हीजेएमचा उपक्रम : ३०० वृक्षांचे होणार रोपणवर्धा : आपल्या वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून भूजल पातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय जनजागृती मंचाने हाती घेतलेल्या प्रकल्पाला मूर्त रूप येत आहे. ही चळवळ आता केवळ व्हीजेएमची राहिली नसून त्यात जनसहभागही मिळू लागला आहे. नागरिक यथाशक्ती मदत करीत असल्याने हनुमान टेकडीवर व्हीजेएम व नागरिकांच्या प्रयत्नाने तब्बल एक कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण होणार आहे. राज्यात काही भागात जाणवलेले पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य आणि खालावत चाललेली भूजल पातळी लक्षात घेता पुनर्भरण हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. टंचाईग्रस्त भागात शासन, सामाजिक संस्था व नागरिकांच्या माध्यमातून पुनर्भरणासाठी प्रयत्न केले जात आहेतच; पण आपल्याही जिल्ह्यात भविष्यातील टंचाईची शक्यता ओळखून कुणीतरी समोर येणे गरजेचे होते. हा पुढाकार वैद्यकीय जनजागृती मंचाने घेतला. प्रारंभी एक-दोन करीत तब्बल ५० ते ६० नागरिकांच्या श्रमदानातून हनुमान टेकडी पिपरी (मेघे) येथे पुनर्भरण प्रकल्पाने मूर्त रूप घेतले. व्हीजेएम व नागरिकांच्या मदतीने टेकडीवर ८ बाय २ बाय २ या आकाराचे तब्बल १५० खंदक करण्यात आले आहेत. टेकडीवरील पावसाचे पाणी वाहून येत या खड्ड्यांमध्ये जिरणार आहे. पावसाचे पाणी आणि माती वाहून जाऊ नये म्हणून प्रत्येक खंदकाच्या माथ्यावरील भागात वृक्षांची लागवड केली जात आहे. या टेकडीवर सुमारे ३०० वृक्षांचे रोपण करण्याचा मानस व्हीजेएमद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. या कामाला रविवारपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. खंदक आणि वृक्षांच्या माध्यमातून या टेकडीवर पावसाळ्यात तब्बल एक कोटी लिटरपेक्षा अधिक पाण्याचे पुनर्भरण करणे शक्य होणार आहे. परिणामी, येत्या काही वर्षांत शहरातील एक टेकडी भूजल पातळीत वाढ करणारी तसेच वातावरण रमनिय करणारी ठरणार आहे.खंदकांचे काम श्रमदानातून पूर्ण करण्यात आल्यानंतर आता टेकडीच्या सभोवताल कुंपण करण्यात येणार आहे. या परिसरात गुरांमुळे झाडांना धोका होऊ नये, उपद्रवींचा त्रास होऊ नये म्हणून ही उपाययोजना केली जाणार आहे. यासाठी ही चळवळ नागरिकांची होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले जात असून लोकसहभागासाठी रविवारी कार्यशाळाही घेण्यात येत आहे. या लोकोपयोगी चळवळीमध्ये किती नागरिक स्वयंस्फूर्तपणे सहभागी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)उपक्रम समाजाचा होणे अपेक्षितवर्धा शहरातील नागरिक सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतात, हा अनुभव आहे. याच अनुभवातून वैद्यकीय जनजागृती मंचाच्या लोकोपयोगी उपक्रमालाही नागरिकांची साथ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. व्हीजेएमचा हा उपक्रम समाजाचा झाल्यास भूजल पातळीत वाढ करण्याच्या संकल्पाला मूर्त रूप येऊ शकते. शिवाय वर्धा शहराला भविष्यात भासणारी पाण्याची टंचाई कित्येक वर्षांसाठी दूर करता येणार आहे. यामुळे नागरिकांनी आपलेच हित लक्षात घेऊन हा उपक्रम आत्मसात करणे गरजेचे झाले आहे.रविवारी बैठक व कार्यशाळावैद्यकीय जनजागृती मंचाने प्रथम हाती घेतलेली पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणारी योजना आता जनतेची झाली आहे. खंदक करण्याचे काम श्रमदानातून आटोपण्यात आले आहे; पण वृक्षारोपण, टेकडीला कुंपण करणे आदी कामे व्हायची आहेत. यात कुंपणासाठी नागरिकांचा सहभाग गरजेचा राहणार आहे. यासाठी वैद्यकीय जनजागृती मंच प्रयत्न करीत असून रविवारी सकाळी ७.३० वाजता बैठक व कार्यशाळा आयोजित आहे. यात डॉ. सचिन पावडे मार्गदर्शन करतील. नागरिकांचा सक्रीय सहभाग मिळाला तर एक चांगली योजना कार्यान्वित होणार आहे.३०० वृक्षांचे रोपणहनुमान टेकडीवर खंदकांच्या बाजूला माती वाहून जाऊ नये म्हणून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यात ३०० वृक्ष लावण्याचा मानस असून रविवारपासून दररोज ५० रोपट्यांचे रोपण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय जनजागृती मंचाकडून देण्यात आली.
एक कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण
By admin | Published: June 26, 2016 2:01 AM