संदीप इरटवार : मासिक व्याख्यानमालेत चित्रफितीद्वारे दिली उपयुक्त माहिती वर्धा : शरीरातील बारीकसारीक गाठींकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. या गाठी भविष्यात कर्करोगाकडे नेणाऱ्याही असू शकतात. याची जाणीव ठेवली पाहिजे. शरीरावरील गाठी असो किंवा डोकेदुखीला कारणीभूत ठरलेल्या मेंदुतील गाठी या शारीरिक बदलांची जाणीव होताच त्वरित तपासणी करणे आरोग्यासाठी हिताचे असते, असे मत डॉ. संदीप इरटवार यांनी व्यक्त केले. सावंगी (मेघे) येथील राधिकाबाई मेघे स्मृती परिचर्या महाविद्यालय आणि वर्धा सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थानिक साई मंदिर सभागृहात जवाहरलाल राठी स्मृती मासिक व्याख्यानमाला घेण्यात येते. ब्रेन ट्युमरची लक्षणे व आधुनिक उपचार या विषयावर डॉ. इरटवार यांचे व्याख्यान घेण्यात आले. डॉ. इरटवार यांनी चित्रफितीद्वारे मेंदूतील गाठी कशा असतात, कशा दिसतात, त्याचे शरीरावरील परिणाम, ब्रेन ट्युमरची लक्षणे, शस्त्रक्रिया व उपचार या विविध पैलंूवर उपयुक्त माहिती दिली. प्रास्ताविक दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे यांनी केले. मंचावर साई सेवा मंडळाचे सचिव सुभाष राठी, डॉ. विजय बोबडे उपस्थित होते. संचालन एन.पी. शिंगणे यांनी तर आभार वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता राकेश अगडे यांनी मानले. आयोजनाला प्रतिक गडकरी, सुशांत वानखेडे आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
‘ब्रेनट्युमर’ची लक्षणे वेळीच ओळखून उपचार घ्या
By admin | Published: February 02, 2017 12:51 AM