वर्धा: पंधरवड्यापूर्वी सोयाबीनचा विक्रमी भाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटल होता. मात्र, याचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा झाला नाही. अचानक दर घसरल्यानं शेतकरी चिंतातूर झाला आहे.
मागील वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली होती. यामुळे शेतकऱ्यांकडे सोयाबीनच शिल्लक नव्हते. ज्यांच्याकडे होते ते विकून मोकळे झाले होते. तसेच व्यापाऱ्यांजवळही सोयाबीन नव्हते. यामुळे कधी न मिळालेला सोयाबीनला विक्रमी भाव जुलै - आगस्ट महिन्यात मिळाला. यामुळेच यंदा सोयाबीनला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळेल, असे स्वप्न उराशी बाळगून शेतकरी सोयाबीनची सवंगणी व काढणीला गती देत आहेत. पण, दिवसेंदिवस सोयाबीनचे दर पडत असल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे चित्र दिसून येते. तसेच पाऊसही शेतकऱ्यांचा पिच्छा सोडेना, पावसाच्या व्यत्ययामुळे सोयाबीनच्या सवंगणीला विलंब होत असल्याचे शेतकरी सांगतात.
सोयाबीन निघण्याच्या अगदी तोंडावरच सोयाबीनचे भाव पडले. साधारणपणे १० हजार प्रतिक्विंटल सोयाबीनचा दर होता. दोन दिवसांपूर्वीच तो ८,२०० झाला. काल त्यात मोठी घसरण होऊन प्रतिक्विंटल ५,५०० ते ५,७०० दर आहे. म्हणजे तब्बल ४० ते ५० टक्के दर पडले आहेत. सोयाबीनचे दर पडणारच होते. गेल्याच आठवड्यात १५ लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात केले आहे. याला महाराष्ट्र सरकारने लेखी विरोध केला आहे. त्यातच खाद्यतेल आयात शुल्क कमी केले आहे. त्याचबरोबर सोयापेंड १२ लाख टन आयात केली आहे. मग सोयाबीनचे भाव पडणारच, असे जाणकार शेतकरी सांगतात.