ग्रामस्थांचे धरणे : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जंगलव्याप्त परिसर असलेल्या कारंजा (घा.) तालुक्यातील येनिदोडकासह सेलू तालुक्यातील गरमसूर व रायपूर येथील नागरिक वन्यप्राण्यांच्या हैदोसान त्रस्त झाले आहे. यामुळे या भागातील ८० टक्के शेती पडीक राहते. यामुळे या गावांचा बोर अभयारण्यात समावेश करून त्यांचे पुर्नवसन करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. कारंजा (घा.) तालुक्यातील धानोली ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या येनिदोडका येथे १०० घरांची लोकवस्ती आहे. सेलू तालुक्यातील रायपूर येथे १७५ व गरमसुर येथे ४५० घरांची लोकवस्ती आहे. तिन्ही गावे जंगलव्याप्त असल्याने वन्यप्राणी गावाकडे येतात. त्यांच्या हल्ल्याने पाळीव प्राण्यांसह गावकऱ्यांचाही जीव धोक्यात आला आहे. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे अनेकांनी शेती करणे सोडले आहे. यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या गावांचे पुर्नवसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. धरणे आंदोलनात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष नामदेव मेश्राम, ग्राम पुर्नवसन समितीचे उदाराम मंडारी, रामचंद्र मसराम, विठ्ठल मडावी, गरमसूरचे सरपंच वनमाला चोपडे, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, रायपूरचे सरपंच सुरेश चावरे, उपसरपंच माया कोराम यांच्यासह तिन्ही गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीने घेतला होता ठराव येनिदोडका, गरमसूर व रायपूर या तिन्ही गावातील नागरिकांनी एकमताने आपल्या गावाचा बोर अभयारण्यात समावेश करण्याचा ठराव घेतला आहे. सदर ठरावाला एकमताने ग्रा.पं.त मंजुरी मिळताच पुढील कार्यवाहीसाठी तो संबंधीतांना पाठविण्यात आला. परंतु, त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. नागरिकांची समस्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पाऊल उचलण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
येनिदोडका, रायपूर, गरमसूरचे पुर्नवसन करा
By admin | Published: June 10, 2017 1:25 AM