वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १२ नोव्हेंबर १९४७ रोजी दिवाळीनिमित्त लोकहितवाहिनीला दिलेल्या १० मिनिटांच्या मुलाखतीची ध्वनिफित दिग्रस तालुक्यातील कांदळी या छोट्याशा गावातील असलम खान नामक शिक्षकाने गांधी जयंतीदिनी सेवाग्राम आश्रम परिसरात प्रत्यक्ष येवून ऐकविली. गांधीजीच आपल्याशी संवाद साधत असल्याचा अनुभव यावेळी उपस्थितांना आला.रेडिओवरील आवाज मुद्रित करून आगळावेगळा उपक्रम असलम खान राबवितात. महात्मा गांधी यांनी १२ नोव्हेंबर १९४७ रोजी आकाशवाणी धुळे केंद्रावरून लोकहितवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीचे ध्वनीमुद्रण खान यांनी केले होते. आज ही मुलाखत अत्यंत दुर्र्मिळ असून महात्मा गांधींच्या आवाजातील ध्वनिफित असलम खान यांनी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत मठकर यांना दिली. यावेळी लोकवाहिनीद्वारे प्रसारित केलेली मुलाखत सर्वांना ऐकविण्यात आली. यवतमाळ जिल्ह्याच्या कांदळी येथील असलम खान या सेवानिवृत्त शिक्षकाकडे ८ हजार बोलक्या ध्वनिमुद्रणांचा संग्रह आहे. यामध्ये हजारो आवाज अत्यंत कल्पकतेने त्यांनी संग्रहित केले आहे. १९९२ पासून आकशवाणी तसेच बीबीसी, व्हॉईस आॅफ अमेरिका, व्हॉईस आॅफ जर्मनी या केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचेही त्यांनी ध्वनिमुद्रण केले आहे. खान यांच्याकडे असलेल्या ८ हजार ध्वनिमुद्रण संग्रहामध्ये भारत माता ही संग्रहमाला असून आझादी की तयारी, पचास दिन, पचास साल पहले यास मधुकर उपाध्याय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा कार्यक्रमही ध्वनिमुद्रित आहे. २६ जून १९४७ ते १५ आॅगस्ट १९४७ या काळातील भारतीय स्वातंत्र्याची चळवळ तसेच महात्मा गांधी, जॉन केनेडी यांची भाषणेही संग्रहीत आहेत.(शहर प्रतिनिधी)
गांधीजींच्या भाषणाच्या दुर्मीळ ध्वनिफितीचे आश्रमात विमोचन
By admin | Published: October 05, 2014 11:12 PM