इन्स्पायर अवॉर्डला प्रारंभ : रविवारी होणार समारोपवर्धा : माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, याकरिता शासनाच्यावतीने विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत ‘इन्स्पायर अवॉर्ड’ या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन आले आहे. शुक्रवारी येथे या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत जिल्ह्यातील ३१२ शाळांतून विविध प्रतिकृती सादर करण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनात ३२८ प्रतिकृती येतील असे आयोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजन करण्यात आले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एकूण ३१२ प्रतिकृती सादर केल्या आहेत. यात अनेक प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची दाद देणाऱ्या आहेत. इंधनाच्या भासत असलेल्या टंचाईवर मात करण्याकरिता कारंजा तालुक्यातील उमरी येथील विद्यार्थ्यांनी बहुद्देशीय सौर चूल सादर केली, तर कोणी होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता बहुआयामी शेती एक पर्याय असल्याचे त्यांच्या प्रतिकृतीतून दाखविले आहे. तर दिवसेंदिवस वाढत असलेल्या वायू प्रदूषणावरही मात करणे शक्य असल्याचे एका विद्यार्थ्याने त्याच्या प्रतिकृतीतून दाखविले आहे. केसरीमल कन्या शाळेच्या विद्यार्थिनीने हेलियम तीनपासून उर्जानिर्मिती शक्य असल्याचे सांगितले आहे. अनेकांना विचार करण्यास बाध्य करणाऱ्या अनेक प्रतिकृती येथे चिमुकल्यांनी सादर केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिकृती आजच्या स्थितीवर मात करण्याकरिता महत्त्वाच्या ठरणाऱ्या असल्याचे जाणवते. त्यांचे प्रयोग साऱ्यांना आकर्षित करणारे असेच आहेत. या प्रदर्शनाच्या आयोजनाकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने सर्व व्यवस्था करण्यात आली. एका प्रतिकृतीसोबत दोन विद्यार्थी व एक शिक्षक अशी नोंद करण्यात आली आहे. यानुसार एकूण ६२४ विद्यार्थी व ३१२ शिक्षक येथे मुक्कामी राहणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या जेवणाची, मुक्कामाची सर्वच व्यवस्था आयोजनाच्या स्थळी करण्यात आली आहे. नागठाण येथील अग्निहोत्री कॉलेज आॅफ इंजिनिअरींग येथे आयोजित या प्रदर्शनाचे आज उद्घाटन झाले. यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मिलिंद भेंडे तर अध्यक्ष म्हणून अग्निहोत्री महाविद्यालयाचे शंकरप्रसाद अग्निहोत्री उपस्थित होते. व्यासपीठावर प्रदर्शनाचे आयोजक माध्यमिक शिक्षणाधिकारी विश्वास लबडे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांच्यासह माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी अशोक लांजेवार यांची उपस्थिती होती. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी लबडे यांनी प्रास्तविकातून आयोजनाची माहिती दिली. संचालन संदीप चिचाटे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्राथमिक शिक्षणाधिकारी धनराज तेलंग यांनी मानले. शिक्षण विभागाच्यातीने विविध कर्मचारी, आठही तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांसह शिक्षकांची उपस्थिती होती. या प्रदर्शनाचा समारोप रविवारी होणार आहे. शनिवारी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना ही प्रदर्शनी दाखविण्यात येणार आहे. रविवारी प्रदर्शनाचा समारोप असून विजेता प्रतिकृती राज्यस्तरीय प्रदर्शनात जिल्ह्याचे नेतृत्त्व करणार आहे.(प्रतिनिधी)
बालवैज्ञानिकांनी सादर केल्या ३१२ प्रतिकृती
By admin | Published: September 19, 2015 3:24 AM