शिवसेना : जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे वर्धा : महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ एमआयडीसी सेवाग्राम येथील खत कारखान्यातील कंत्राटी कामागारांवर अन्याय होत आहे. तो अन्याय दूर करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा. उद्योग अधिनियम १९४७ च्या कायद्यानुसार थकित वेतन व सेवा संपुष्टात आणल्याने त्यांना सेवेच्या संलग्नतेसह मागील वेतनासह पूर्ववत कामावर घ्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली. याबाबत जिल्हा कामगार अधिकारी राजरत्न धुर्वे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ येथे गत पाच वर्षांपासून कार्यरत कामगार मनोहर धोंडबाजी सोनवणे (३३) रा. जयपूर, ता. सेलू व शुभम कमलाकर उईके (२७) रा. तळोदी, ता. सेलू यांना कुठलीही चुक नसताना ३० जून २०१६ रोजी कामावरून कमी केले. त्यांना त्वरित कामगार घेण्यात यावे. कामगारांकडे कृ.उ.वि. महामंडळ वर्धा येथे काम करीत असल्याचा कुठलाही पुरावा नाही. कामगारांना नेमके वेतन किती आहे, पीएफ किती कपात होतो, हे माहिती नाही. वरिष्ठांना विचारणा केल्यास माहिती मिळत नाही. यासाठी पीएफ व वेतन पावती द्यावी. वेतनाचा दिनांकही निश्चित करावा. सुरक्षा सुविधा मिळत नाही. बुट, गणवेश, हातमोजे आदी फॅक्टरी अॅक्टमध्ये येणाऱ्या सुविधा द्याव्या. औषधोपचार, ठराविक सुट्टी मिळत नाही. कामगारांना पूर्ववत कामावर घेत कंपनी अॅक्टनुसार सुविधा द्याव्या, अशी मागणी करण्यात आली. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख तुषार देवढे, प्रा. राजू गोरडे, कामगार प्रतिनिधी मनोज आतराम, गौरव भेलाये, विवेक मुंजेवार, गजानन बनकर, राजू ठेकेदार, अभय देवढे, मनोहर सोनवणे, नितेश राऊत, विजय कोहळे, उमेश राऊत यासह कामगार उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
खत कारखान्यातील कामगारांवरील अन्याय दूर करा
By admin | Published: July 25, 2016 2:02 AM