निवेदन: स्वाभिमानी संघटनेची मागणी आष्टी (शहीद) : शेतकऱ्यांच्या विविध समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या समस्या शासन सोडवायला तयार नाही. शेतमालाला योग्य भाव नाही. महागाई वाढत आहे. शैक्षणिक असुविधा कायम असून शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, या समस्या सोडवाव्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. याबाबत तहसीलदार सीमा गजभिये यांना निवेदन देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख देवेंद्र भुयार यांना अमरावती जिल्ह्यातून तडीपाल केल्याचा निषेधही आष्टी तालुका संघटनेने नोंदविला. भुयार शेतकरी हितासाठी झटत आहे. नागरिकांचे हाल व शेतकऱ्यांवरील अन्यायाविरूद्ध लढा दिला. आंदोलनात्मक पवित्रा घेऊन झटत राहीले. नागरिकांचे प्रश्न, शेतकरी कुटुंबाला मदत, बी-बियाणे वाटप कार्यक्रम घेतले. असे असताना अमरावती जिल्ह्यात राजकारणातून बळी देण्यासाठी भुयार यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव त्वरित रद्द न केल्यास आंदोलन करून विदर्भ बंद करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना तालुकाप्रमुख आशिष वाघ, पवन नागपुरे, निखील पानबुडे, रवींद्र सोनुले, सागर निमजे, रोशन बसवंते, अनिल मानकर, चरण होले, अंकुश ढवळे, जावेद खाँ, राजू खिरडकर, राहुल वैद्य आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढा
By admin | Published: July 22, 2016 1:51 AM