ग्रा.पं.चा प्रताप : २५ लाखांचे काढले कर्ज वायगाव (नि.) : येथील ग्रा.पं. इमारतीचे नुतनीकरण करण्याकरिता ग्रामपंचायतीला २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या कर्जाची परतफेड सात वर्षांत करावयाची असून सध्या १० लाख रुपये ग्रा.पं. ला प्राप्त झाले आहे. इमारत नुतनीकरणाच्या नावावर कवेलू काढून डागडुजी करून टिनपत्रे टाकण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या होत असलेल्या कामाला नुतनीकरण म्हणावे की डागडुजी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. इमारतीच्यावरील कवेलू काढून जुन्याच इमारतीवर पुन्हा विटाचे थर देऊन इमारत बनविण्याचा प्रयोगही केला जात आहे. ज्या भागात सिमेंटचे काम केले त्या बांधकामावर पाणी मारणे बंद केले आहे. त्यामुळे मजबुती येईल, हा प्रश्न आहे. ग्रामपंचायतची जुनी इमारत सन १९६३ मधील आहे. ५४ वर्ष जुन्या इमारतीवर जुडाई केली जात आहे. नुतनीकरणाच्या नावावर होत असलेली डागडुजी पाहता ग्रामस्थांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक केली आहे. वरिष्ठांनी या बांधकामाकडे लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.(वार्ताहर)
नुतनीकरणाच्या नावावर ५४ वर्षांपुर्वीच्या इमारतीचीच डागडुजी
By admin | Published: March 18, 2017 1:14 AM