लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रस्त्यावरील अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठी त्याच्या कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. यासाठी पुढच्या १० दिवसात अपघात प्रवण स्थळांचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या कारणांचे विश्लेषण करून अहवाल सादर करण्याचा सूचना खासदार रामदास तडस यांची दिल्यात.जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, विजय तिराणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मुन , प्रणव जोशी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. सर्वात जास्त अपघात कोणत्या रस्त्यावर, का होतात? त्यासाठी कोणता विभाग जबाबदार आहे? कोणत्या वाहनाचा, कोणत्या वाहनांमुळे जास्त अपघात होतो, मागील वर्षभरात मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या आदी बाबी विश्लेषणामध्ये घेण्यात याव्यात. महामार्गावर वाहतूक करणाऱ्या जड वाहनांची नियमित तपासणी करावी असेही त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी यांनी नवीन रस्त्यांचे सर्वेक्षण करून अपघात प्रवण स्थळांचा शोध घेऊन त्यासाठी वेळीच उपायायोजना कराव्यात. तसेच हेल्मेट न घातल्यामुळे किती लोकांचा मृत्यू झाला याचीही माहिती संकलित करावी. महामार्गावर हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करून त्यांना दंड आकारावा. महामार्गावर अशी मोहीम महिनाभर राबविण्यात यावी आणि जनतेमध्ये याबाबत जनजागृती करावी. रस्त्याच्या कडेला माहिती व दिशादर्शक फलक दिसत नाहीत, सार्वजनिक बांधकाम विभागाने असे फलक तातडीने लावून घ्यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. नगर पालिका क्षेत्रामध्ये मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होतात त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने याबाबत योग्य कार्यवाही करावी. यासाठी नियमांच्या आधारे जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचा सूचना यावेळी यांनी दिल्यात. जिल्ह्यात ३९ ब्लॅक स्पॉट असल्याची माहिती खरमाटे यांनी दिली.
दहा दिवसात अपघाताच्या कारणांचा अहवाल सादर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:02 AM
सर्वात जास्त अपघात कोणत्या रस्त्यावर, का होतात? त्यासाठी कोणता विभाग जबाबदार आहे? कोणत्या वाहनाचा, कोणत्या वाहनांमुळे जास्त अपघात होतो, मागील वर्षभरात मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या आदी बाबी विश्लेषणामध्ये घेण्यात याव्यात.
ठळक मुद्देरामदास तडस : रस्ता सुरक्षा समितीची बैठक