महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वातावरणातील बदलाचा प्रत्येक प्राणीमात्रावर थोडा का होईना, परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. असेच काहीसे बदल वर्धा जिल्ह्यातील कडूनिंबाच्या झाडावर आढळून आले आहेत. त्या झाडाच्या फळातून तीन रोपटे तयार करण्यात आले असून त्या रोपट्यांवर सध्या संशोधन केले जात आहे. कडूनिंब हे औषधी वृक्ष असून त्यात काही बदल तर झाले नाही ना, याची पडताळणी सध्या तज्ज्ञांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, हा देशातील पहिला प्रयोग असल्याचे सांगण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील कडूनिंबाच्या काही झाडांवर वातावरणाच्या बदलाचे परिणाम झाल्याचे वन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले. ही बाब लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. सदर माहिती मिळताच फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट देहरादूनचे प्लान्ट जिनेस्टिक तथा शास्त्रज्ञ डॉ. रमाकांत यांनी वर्धा गाठले. सुमारे दोन दिवस त्यांनी वर्धा येथे थांबून वातावरणातील बदलाचे परिणाम दिसून आलेल्या झाडांची पाहणी केली. शिवाय काही मार्गदर्शक सूचनाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. त्यानंतर याच बदल दिसलेल्या कडूनिंबाच्या झाडाच्या फळापासून तीन रोप तयार करण्यात आले. त्याचे डीएनए नमुनेही त्यांनी तपासणीसाठी नेले आहे. डीएनए चाचणीतून सदर कडूनिंबाच्या झाडातील औषधी गुणधर्मात काही बदल झाला काय, याची पडताळणी केली जाणार आहे. इतकेच नव्हे, तर अधिकची माहिती जाणून घेतली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
वन विभागाच्या कार्यालय परिसरात लावले रोपटे१५ मे ला गोळा केलेले बी ७ जून रोजी लावण्यात आले. त्यानंतर योग्य पद्धतीने निगा घेतल्यानंतर बीजही अंकुरले. शिवाय रोपट्याची वाढही बºयापैकी झाली. हेच तीन रोपटे वन विभागाच्या वर्धा कार्यालयाच्या आवारात उपवनसंरक्षक सुनील शर्मा, वन्य जीव प्रतिपालक कौशल मिश्र यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांच्या प्रमुख उपस्थितीत लावण्यात आले आहे. केवळ रोपटे लावून वर्धा विभाग थांबला नसून त्या रोपट्याचे संगोपनही त्यांच्याकडून केले जात आहे.