लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्यावर्षीच्या अल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा चांगल्याच तीव्र झाल्या होत्या. जलाशयातील मृतसाठाही संपुष्ठात आला होता. पण, वरुणराजाने उशिरा का होईना कृपादृष्टी ठेवल्याने सध्या जलाशयाची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. काही फुल्ल झाले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेकांमध्ये उत्साह संचारला असून सेल्फी काढून सोशल मिडीयावर पोस्ट करीत आहे. पण, या पाण्याचा उन्माद न करता काटकसरीने वापर करण्याची गरज व्यक्त होत आहे.जिल्ह्यात मोठे व मध्यम असे एकूण ११ जलाशय आहेत. गेल्यावर्षी या सर्व जलाशयामध्ये आजच्या दिवसापर्यंत २००.४७ दलघमी जलसाठा उपलब्ध होता.परंतु, यावर्षी या सर्व जलाशयामध्ये ३१२. ८८ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. यावरुन मागच्या वर्षीपेक्षा यंदा उशिरा का होईना पण, जलसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धाम प्रकल्प हा सर्वात महत्वाचा असून या प्रकल्पातून वर्ध्यासह तेरा गावांना पाणीपुरवठा होतो. तसेच रेल्वे प्रशासन, उद्योग व सेवाग्राम एमआयडीसीलाही पाणीपुरवठा केल्या जातो. मागील वर्षी अल्प पर्जन्यमानामुळे या प्रकल्पात केवळ ५५ टक्केच पाणी उपलब्ध होते. त्यामुळे उन्हाळ्यात सर्व गावांनाच पाण्याचा फटका बसला. शहरासह गावांना आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. या जलाशातील मृतसाठाही उपसण्यापर्यंत भीषणता निर्माण झाली होती.वैद्यकीय जनजागृती मंचासह नगरपालिकेनेही पुढाकार घेत नागरिकांना पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. बऱ्याच नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत उपाययोजनाही केल्यात. अशातच दमदार पावसामुळे धामप्रकल्प शंभर टक्के भरला असून ओव्हर फ्लो होत आहे. यासोबतच पोथरा प्रकल्प, पंचधारा, डोंगरगाव प्रकल्प,मदन उन्नई प्रकल्प, वर्धा कारनदी प्रकल्प व सुकळी लघू प्रकल्पही फुल्ल झाला असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जलशय भरुन पाण्याचा होणारा विसर्ग पाहण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे.सध्याची पाण्याची स्थिती मागील वर्षीपेक्षा भक्कम असल्याने पाणी बचतीकडे पाठ फिरवून पाण्याचे वारेमाप उधळपट्टी करु नये. यावर्षी सहन केलेल्या त्रासाचा विचार करुन ‘जल है तो कल है’ हीच मानसिकता पुढेही कायम ठेवण्याची गरज आहे.