संजय भागवत : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठकवर्धा : ग्राहकांच्या हिताचे, समस्यांचे निराकरण समन्वय आणि संवादामधून तात्काळ करण्यात यावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले. भागवत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात पार पडली. बैठकीला ज्ञानेश्वर ढगे, सुरेश ठाकरे, अॅड. संध्या पुरेकर, किशोर मुटे, अजय भोयर, विलास कांबळे, श्याम अमनेरकर, डॉ. ना. ना. बेहरे, प्रणव जोशी, संजय बाळबुधे यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता शंकर कांबळे उपस्थित होते. बैठकीला सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकार यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. त्यावर सर्व सदस्यांनी विविध विषयांवर त्यांची मते मांडली. महापारेषण संबंधातील विविध प्रश्नांवर अधीक्षक अभियंता यांनी अशासकीय सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देवून करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने विभागातील अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी विभागातील डॉक्टरांच्या रिक्त पदांबाबत माहिती देऊन पुढील काळात या दिशेने कार्यवाही होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मागील कार्यकाळात केलेल्या कार्यवाहीबाबत सभासदांना अवगत केले. कृषी विभागाशी संबंधित विषयावर पुढील सभेत सादरीकरण करण्यात येणार आहे. दरमहा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक घेण्याचेही निर्देश अपर जिल्हाधिकारी यांनी दिले. सर्वच विभाग प्रमुखांनी चर्चेस आलेल्या मुद्यांवर अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी दिले. वर्धा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ग्राहकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करून समन्वयातून तोडगा काढण्याचे व्यासपीठ असल्याने जिल्ह्यातील पोलीस, जिल्हा परिषद, अन्न व औषध प्रशासन विभाग, दूरसंचार, परिवहन विभाग व जिल्हा माहिती कार्यालयातील कार्यालयीन प्रमुखांचा समावेश आहे. एकूण २७ अशासकीय सदस्यांची नियुक्ती पूर्ण करण्यात आली आहे. आभार जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)
समन्वय व संवादातून ग्राहकांच्या समस्या सोडवा
By admin | Published: September 21, 2015 1:59 AM