अखिल भारतीय अंनिसच्या नियोजन व अंमलबजावणी मंडळाची त्रि-दिवसीय बैठक लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गत ३५ वर्षापासून सातत्याने समाजात बुद्धिप्रामाण्य विचारांची पेरणी करणाऱ्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नियोजन व अंमलबजावणी मंडळाची तीन दिवसीय बैठक सेवाग्राम येथे पार पडली. देशाचा आधारस्तंभ असणाऱ्या युवापिढीत वैज्ञानिक दृृष्टीकोण व संवैधानिक मुल्ये रूजविण्यासाठी व्यापक अभियान राबविण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. अंधश्रद्धेमुळे कुणाचाही हकनाक बळी जाऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी जादूटोणाविरोधी कायदा सर्व स्तरावर प्रभावीपणे पोहचवा, असे आवाहन अ.भा. अंनिसचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले. सेवाग्राम येथील यात्री निवासात आयोजित संघटन बांधणी व नियोजन बैठकीला अंनिसचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, महासचिव हरिष देशमुख यांची प्रमुख्याने उपस्थिती होती. बैठकीत मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ अशी विभागवार संघटन बांधणी करण्यासोबतच युवा अंनिस व महिला अंनिसची समांतर फळी राज्यभरात जिल्हा व तालुका पातळीवर उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गत ३५ वर्षे निरपेक्ष भावनेने लोकजागरणासाठी कार्यरत असणाऱ्या या समितीच्या आर्थिक नियोजनावर या बैठकीत चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी स्वबळावर व समाजातील हितचिंतकाच्या सहकार्यावर या चळवळीचा आर्थिक पाया सक्षम करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. बैठकीला अॅड. गणेश हलकारे, दिलीप सोळंके, अशोक घाटे, विजय मोकाशी, शरद वानखेडे, पुरूषोत्तम आवारे, शशीकांत गमरे, मिलिंद बागवे, झुरमुरे, सपाटे, हरिभाऊ पाथोडे, छाया सावरकर, डॉ. प्रकाश घोटे, कमल खेतान, नरेंद्र पाटील, प्रतिभा भुतेकर, किशोर वाघ, पंकज वंजारे, डॉ. स्वप्ना लांडे, पौर्णिमा अवसरमोल, बागवे, संजय इंगळे तिगावकर, हरिष इथापे, प्रा. ठाकरे आदींची उपस्थिती होती.
युवा पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याचा संकल्प
By admin | Published: June 15, 2017 12:51 AM