लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाकाळात आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या आरोग्य विभागाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार रिक्तपदाच्या भरणा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवूनही त्याला मंजुरी मिळत नसल्याने आता आरोग्याचा डोलारा सांभाळताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. ऑक्सिजन मिळेल, व्हेंटिलेटरचीही व्यवस्था होईल पण, लागणारे मनुष्यबळ आणणार कु ठून असा प्रश्न आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जिल्ह्यातील अल्प मनुष्यबळच दीड वर्षापासून आरोग्याची जबाबदारी भक्कमपणे सांभाळत आहे. पण, अखेर तेही मनुष्यच असल्याने त्यांचीही सहनशक्ती संपायला लागली आहे.जिल्ह्यातील १५ लाख ७८ हजार ६२० नागरिकांना मोफत आणि चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंदांवर आहेत. नागरिकांना वेळीच उत्तम सुविधा मिळण्याकरिता आरोग्य यंत्रणाही सुसज्ज असणे गरजेचे आहेत. पण, शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरी व ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील तब्बल ३१ टक्के पदे रिक्त असल्याने तोकड्या मनुष्यबळावरच आरोग्याचा डोलारा सांभाळावा लागत आहे. जिल्ह्याला सावंगी आणि सेवाग्राम येथील दोन रुग्णालयाचा आधार असल्याने आतापर्यंत आरोग्य यंत्रणा सदृढ होती. पण, या कोरोनाच्या दुसऱ्या लाटीत आरोग्य यंत्रणा खालावलेली दिसून येत आहे. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी गावापासून तर शहरापर्यंत आरोग्य कर्मचारी दिवसरात्र झटत आहे. पण, मोठ्या लोकसंख्येपुढे ही तोकडी आरोग्य यंत्रणा आता कमी पडत आहे. कोरोनासोबत इतरही आजारावर नियंत्रण मिळवायचे असल्याने गेल्या दीड वर्षांपासून आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी घायकुतीस आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागातील पदे भरली नसल्याने आता आरोग्यबाबत हयगय होत आहे. नागरिकांच्या आरोग्याबाबत कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा दम देणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही यासाठी कधी पुढाकार घेतलेला दिसला नाही. या महामारीतून अनुभव घेत आधी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याची गरज व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागातील बहूसंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे या कोरोनाकाळात यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. तरीही रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, याकरिता आहे त्या मनुष्यबळाच्या आधारे अहोरात्र आरोग्य सेवा दिली जात आहे. रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आले पण, पदे भरली नाही. परिणामी आता कोणत्याही रजा न घेता काम करावे लागत आहे.डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने रिक्तपदे भरण्याकरिता वारंवार निवेदनातून शासन व जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली. परंतु अनेक वर्ष मंजूर पदाची जिल्हा प्रशासनाकडून बिंदूनामावली करण्यात आली नाही. तसेच २२११ लेखाशिर्ष अंतर्गत पदाचा घोळ सुटलेला नाही.दिलीप उटाणे, राज्य कार्याध्यक्ष, जि.प.आराेग्य सेवा कर्मचारी संघटना, वर्धा