रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहन दुचाकी असो वा चारचाकी ते चालविण्याकरिता कायद्याने दिलेला परवाना आवश्यक आहे. हा परवाना देण्याकरिता शासनाच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन विभागाला अधिकार देण्यात आले आहेत. हा परवाना मिळविण्याकरिता काही कर भरणे अनिवार्य आहे. हाच कर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीचे वजन वाढविणारा ठरत आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१७ ते २०१८ या बारा महिन्यांच्या काळात तब्बल २० हजार ४७ नवे चालक परवाने वितरित करण्यात आले आहे. या परवान्यांतून उपप्रादेशिक परिवहन विभागाला १ कोटी ९२ लाख २८ हजार ४६२ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.रस्त्याने वाहन चालविताना त्या वाहनाच्या चालकाकडे परवाना आवश्यक आहे. विनापरवाना वाहन चालविणे कायद्याने गुन्हा ठरते. यामुळे तो काढण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने एक वेगळी शाखाच देण्यात आलेली आहे. या शाखेमार्फत वाहन चालकांना शिकाऊ आणि स्थायी स्वरूपाचा परवाना देण्यात येतो. सध्या हा परवाना देण्याची पद्धत आॅनलाईन करण्यात आलेली आहे. परवाना देण्याच्या या आॅनलाईन पद्धतीला सारथी, असे नाव देण्यात आले आहे. या सारथीमध्ये असलेल्या अनेक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एक आॅनलाईन परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच वाहन चालविण्याचा परवाना दिला जातो. हा परवाना प्राप्त झाल्यानंतरच कायद्यानुसार वाहन चालविणे ग्राह्य धरले जाते.आॅटोरिक्षाच्या परवान्यांतून २०.६२ लाखजिल्ह्यात ५ हजार ४३१ आॅटोरिक्षा रस्त्याने धावत आहे. यापैकी २ हजार ९०० आॅटो चालकांकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना आहे तर २ हजार ५३१ आॅटो खासगी असताना त्यांच्याकडून प्रवासी वाहतूक होत आहे. अशा खासगी आॅटोंना प्रवासी परवाना देण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने मोहीम राबविण्यात आली. या माहिमेतून १५५ खासगी आॅटोचे परिवर्तन प्रवासी आॅटोमध्ये करण्यात आले आहे. या नूतनीकरणाच्या मोहिमेतून ७७ हजार ५०० रुपये परिवहन विभागाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात १८९ नवीन आॅटो रस्त्यावर आले आहे. त्यांच्याकडून प्रवासी परवाने काढण्यात आले असून या माध्यमातून १९ लाख ८४ हजार ५०० रुपयांची कमाई झाली आहे.नूतनीकरणातून ३८.७२ लाखांची कमाईएका वाहन चालकाच्या परवान्याची मुदत साधारणत: २० वर्षांची असते. या परवान्याचे पुन्हा नुतनीकरण करण्याची मुभा वाहतूक कायद्यानुसार देण्यात आलेली आहे. या आर्थिक वर्षात जिल्ह्यात ८ हजार ३१० चालकांनी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले असून यातून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीत ३८ लाख ७२ हजार ४६० रुपयांचा महसूल जमा झाला आहे.शहरात अनेकांकडे वाहतूक परवाने नाहीशहरातील असो वा जिल्ह्यातील रस्ते तेवढेच असले तरी वाहन चालकांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दररोजच वाढत आहे. वाहने वाढत असली तरी कित्येक वाहन चालकांकडे वाहतूक परवाना नसल्याचे वास्तव आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने या संदर्भात चालकांचा परवाना तपासण्याची एक मोहीम राबविण्याची गरज आहे.
परवान्यांतून १.९२ कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:23 PM
वाहन दुचाकी असो वा चारचाकी ते चालविण्याकरिता कायद्याने दिलेला परवाना आवश्यक आहे. हा परवाना देण्याकरिता शासनाच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन विभागाला अधिकार देण्यात आले आहेत. हा परवाना मिळविण्याकरिता काही कर भरणे अनिवार्य आहे.
ठळक मुद्देआरटीओची कामगिरी : वर्षभरात २०,०४७ नवीन तर ८,३१० जुन्यांचे नूतनीकरण