मागणी : तक्रार निवारण समितीचे निवेदन वर्धा : ३१ मार्च २०१७ ला शिक्षण आयुक्त, पुणे यांनी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेबाबत आदेश दिला आहे. यात अतिरिक्त शिक्षक निवडीचा संस्थेला दिलेला अधिकार रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीने निवेदनातून केली आहे. या मागणीचे निवेदन कार्यवाहक अजय भोयर यांच्या नेतृत्वात शिक्षणमंत्री, शिक्षण विभाग सचिव यांना शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत दिले. सन २०१६-१७ च्या संच मान्यतेनुसार खाजगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळातील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांच्या आॅनलाईन समायोजनाबाबत तरतुदी आयुक्तांनी दिलेल्या आदेशात निर्देशित केले आहे. या तरतुदीमध्ये संस्थाना अतिरिक्त शिक्षक निवडीचा अधिकार दिल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची आर्थिक लुबाडणूक होवून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय शिक्षकांच्या गुणवत्तेवर त्याचा विपरित परिणाम होवू शकतो. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक निवडीचा संस्थेला दिलेला अधिकार रद्द करून सुधारित परिपत्रक काढण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्यातील माध्यमिक शाळेतील संच मान्यतेमध्ये मागील तीन वर्षापासून मोठा घोळ निर्माण झालेला आहे. अजूनही बऱ्याच शाळांच्या संच मान्यतेमध्ये शिक्षकांची पदे वाढत असताना त्यांना सुधारित संच मान्यता करून देण्यात आली नाही. त्यामुळे बऱ्याच शाळेमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरत नसताना नियमबाह्यपणे अतिरिक्त ठरविण्याचे काम सुरू आहे. संच मान्यतेचे काम आॅनलाईन पद्धतीने करण्यात येत असताना राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात याविषयी एकसुत्रता नाही. काही जिल्ह्यात वर्ग-९ व १० करीता सरसकट तीन पदे तर कुठे दोन पदे देण्यात आली. शिवाय चुकीच्या संच मान्यतेच्या आधारे संदर्भिय आदेशानुसार समायोजनाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे शिक्षकांची मानसिक स्थिती ढासळून त्याचा अध्यापनावर विपरीत परिणाम पडत आहे. त्यामुळे संच मान्यतेमधील दुरूस्ती पूर्ण झाल्याशिवाय आॅनलाईन समायोजन प्रक्रिया सुरू करू नये, तुर्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, सुधारित आदेश निर्गमित करून त्यात शिक्षक निवडीचा संस्थेला दिलेला अधिकार रद्द करावे, अशीही मागणी या निवेदनात केली आहे. निवेदन देताना पुुंडलिक नागतोडे, अनिल टोपले, राठोड, पराग वाघ, रहिम शाह, संजय बारी, गजानन साबळे, मुकेश इंगोले आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
अतिरिक्त शिक्षक निवडीचा संस्थेला दिलेला अधिकार रद्द करा!
By admin | Published: April 15, 2017 12:33 AM