लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या महामारीत अनेकांचे रोजगार गेल्याने आधीच अनेकांची आर्थिक कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी धडपड सुरुअसतानाच पेट्रोल-डिझलच्या दरवाढीचा सपाटा सुरुच आहे. परिणामी महागाईचा भटका उडाल्याने अनेकांना महिन्याचा खर्च भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या वर्षात सुरुवातीपासूनच पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल शंभरापार गेले असून डिझेलही शंभर रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने इतरही वस्तुंच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सिलिंडरच्या दरामध्येही नुकताच २५ रुपयांनी वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. अनेकांसाठी सिलिंडर विकत घेणे आवाक्याबाहेर गेल्याने चुली फुंकायला सुरुवात झाली आहे. मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लोकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले असताना आता महागाई जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे किराणा, भाजीपाला, कापड यासह इतरही जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्यांना झळ सोसावी लागत आहे. आता या किंमती कमी होण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने या महागाईचाच नागरिकांना सामना करावा लागणार आहे.
ट्रॅक्टरची शेतीही महागलीशेतकऱ्यांचा कल सध्या ट्रॅक्टरच्या सहायाने शेती करण्यावर असून डिझेलचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या खर्चातही वाढ झाली आहे. रोटावेटर, पेरणी, व्हिफासच्या किंमतीमध्ये प्रतिएकरामागे दोनशे रुपयाने वाढ झाली आहे. तर तीन फावडे नागरणीकरिता यावर्षी १,३०० रुपयांऐवजी १,७०० रुपये आणि दोन फावड्याकरिता १,५०० रुपयांऐवजी १,७०० रुपये द्यावे लागले.
व्यावसायिक काय म्हणतात...
देशात पेट्रोल-डिझलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्याने भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ होत आहे. शेतापासून बाजारापर्यंत आणण्याचा खर्च वाढल्याने भाजीपाल्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रणात आल्या तर इतरही वस्तुंच्या किंमती नियंत्रणात राहील.प्रमोद भोयर, भाजी व्यावसायिक
फुलगोबी ८० रु. किलोपेट्रोल-डिझेलच्याही दरवाढीमुळे बाजारपेठेत भाजीपालाही कडाडला आहे. फुलगोबी ८० रुपये तर पत्तागोबी ४० रुपये किलोने विकली जात आहे. तसेच चवळी व गवारनेही चांगलाच भाव खाल्ला असून ६० ते ७० रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे.
डाळ स्वस्त, तेल महागnसध्या महागाईचा भडका उडाला आहे. तूर डाळ ११० रुपये प्रतिकि लो तर चणा डाळ ७० ते ८० रुपये प्रतिकिलो आहे.nया काळात खाद्यतेलाचे भावही दीड शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. सोयाबीन तेल १४० रुपये, फल्लीतेल १७५ रुपये व राईस तेल १४० रुपये प्रतिकिलो आहे.nपेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ होत असताना खाद्य तेलाच्या भावात १० ते १५ रुपयांनी घसरण झाली आहे.
घर चालविणे झाले कठीण
कोरोनामुळे आधीच आर्थिक अडचणींत असताना महागाईचाही भडका उडाला आहे. गॅसपासून भाजीपाला आणि किराण्याच्या भावातही वाढ झाली आहे. त्यामुळे या महामारीच्या काळात जगणे कठीण झाले आहे.सुनंदा बाराहाते, गृहिणी
पेट्रोल-डिझेल, सिलिंडर आदींचे दर वाढल्याने इतरही वस्तुंचे दरवाढले आहे. परिणामी नित्य जीवनात आवश्यक असलेल्या वस्तुंच्या किंमतीही वाढल्या आहेत. खाद्य तेलांच्या किंमती दिडशे रुपये किलोपर्यंत वाढल्या. तसेच भाजीपालाही वाढत असल्याने महिन्याचे बजेट कसे लावावे हा प्रश्नच आहे.प्रीया जगताप, गृहिणी
पेट्रोल-डिझेल व सिलिंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे. परंतु खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये पंधरा ते वीस रुपयांची घसरण झाली आहे. सोयाबीनच्या तेलाचे दर १६५ ते १७० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले होते. आता १४० रुपये प्रतिकिलो आहेत. त्यामुळे खाद्य तेलाच्या किंमती कमी झाल्याचे दिसून येते.अतुल डंभारे, किराणा व्यावसायिक