महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क वायगाव(नि.) : वायगाव(नि.) गाव वर्धा तालुक्यात येत असले तरी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास तक्रार मात्र देवळी येथील वीज वितरण केंद्रात किंवा वायगाव (नि.)च्या वीज वितरण उपकेंद्रात सादर करावी लागते. या भागातील अनेक विद्युत खांब वाकलेले असून त्याच्या दुरूस्तीकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण मिळत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. वायगाव (नि.) परिसरताील या उपकेंद्रात येणाऱ्या गावात वीज वितरण व्यवस्था दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीलाच कोलमडल्याचे चित्र आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी विहिरींच्या पाण्यावर सध्या कसेबसे उगवलेले पीक जगवत आहेत. मात्र, विविध कारणे पुढे करून या भागातील विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडीत केल्या जात आहे. विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या उपकेंद्रांतर्गत २० हजाराच्या जवळ कृषीपंप आहेत. तर १० हजाराच्या वरील घरगुती मीटर आणि व्यावसायिक विद्युत जोडणी आहे. गावातील काही वॉर्डात विद्युत तारांवर वृक्षाच्या फांद्या गेल्या आहेत. त्यामुळे वारा आला की विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्याच प्रमाणे कुरझडी जामठा, वायगाव (नि.) शेत शिवारातील बहुतांश विद्युत खांब वाकलेले आहेत. त्यामुळे मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
वाकलेल्या विद्युत खांबांमुळे जीवितहानीचा धोका
By admin | Published: June 24, 2017 12:55 AM