वर्धा-नागपूर महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना वर्धा : नागपूर महामार्गालगत जडवाहनांचा नित्याने मुक्काम असतो. या वाहनचालकांकडून अनेकदा रस्त्याचाही ताबा घेतला जातो. त्यामुळे वाहतुकीसाठी अर्धाच रस्ता शिल्लक राहतो. रात्रीच्यावेळी मुक्कामाला आलेले ट्रक दुपारपर्यंत रस्त्याच्या कडेला उभे असतात. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी तर होते शिवाय ही बाब अपघाताचे कारण ठरते. समोरुन येणारे वाहन नजरेस पडले नाही म्हणून येथे अपघाताच्या घटना घडल्या आहे. रस्त्यालगतचा हा अवैध थांबा अन्य वाहनचालकांकरिता जीवघेणा ठरत आहे. या प्रकाराकडे वाहतूक पोलीस शाखेने लक्ष देण्याची गरज नागरिकातून व्यक्त होत आहे. नागपूर महामार्गावर दत्तपूर टी-पॉँर्इंट, इंदिरा गांधी पुतळ्याशेजारी, नगरपालिका मार्गावर, पेट्रोलपंपासमोर नित्याने ट्रकच्या रांगा लागलेल्या असतात. ट्रकमालकांच्या अवैध पार्किंगचा भार शहरातील वाहतूक व्यवस्थेला सहन करावा लागतो. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. रस्त्यालगतच्या उभ्या वाहनांमुळे वाहन धारकांना आवागमन करण्यासाठी अरूंद जागा असते. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते. इंदिरा गांधी पुतळ्याला वाहनांचा गराडा असतो. अनेक वर्षांपासून या जागेचा वापर ट्रक चालकांकडून वाहनतळ म्हणून वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलीस शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली; मात्र यानंतर येथील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. अर्ध्या रस्त्यापर्यंत उभे केले जाणारे हे ट्रक रात्रीच्या सुमारास मोठ्या वाहनांच्या प्रकाशझोतात दुचाकी व इतर वाहनचालकांच्या दृष्टीस पडत नाही. त्यामुळे उभ्या ट्रकवर वाहने धडकतात. यात अनेकांना नाहक जीव गमवावा लागल्याने दखल घेण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी) वाहतूक विभागाचे दुर्लक्ष एकीकडे रस्त्यालगत दुचाकी उभी ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. टोइंग पथकाकरवी वाहने उचलून नेली जातात; मात्र वर्दळीच्या या मार्गावरील ट्रकचा हा अवैध थांबा कर्मचाऱ्यांना दिसत नाही का, असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात आहे. येथे मोठा अपघात झाल्यावरच संबंधित विभागाला जाग येईल का, असा रोष व्यक्त केल्या जातो.
रस्त्यालगतच्या उभ्या ट्रकमुळे वाहतुकीची कोंडी
By admin | Published: April 05, 2017 12:41 AM