लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनला आता महिना होत असतानाही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. दोन दिवसांपासून शिथिलतेच्या गैरसमजातून नागरिकांचा संचार वाढला आहे. यात शहरालगतच्या ग्रामपंचायत परिसरातील नागरिकही शहरातच गर्दी करत असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता पुन्हा प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात आली. शहरातील तीन ठिकाणी सकाळपासूनच नाकेबंदी करुन रस्त्यावरील वर्दळ कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन कर्तव्य बजावत आहे.जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करीत नागरिकांचीही गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे. औषधींसह जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच इतरही महत्त्वाचे दुकाने आठवड्यातून एक दिवस सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेषत: नागरिकांना ताजा भाजीपाला उपलब्ध व्हावा म्हणून एका मुख्य भाजीबाजाराची १८ ठिकाणी विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह लगतच्या परिसरातही भाजीपाला उपलब्ध करुन देण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब होतो की नाही, दुकानदारांनी हॅण्ड वॉशची सुविधा केली की नाही आदीवर प्रशासन लक्ष ठेऊन असून वेळप्रसंगी दंडात्मक कारवाईही करीत आहे. औषधी वगळता इतर काही दुकाने दुपारी १ वाजतापर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी असल्याने दुपारपर्यंत नागरिकांची वर्दळ असते. आतापर्यंत दुपारनंतर रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची गर्दी वाढायला लागली होती. शहरासोबतच लगतच्या परिसरातील नागरिकही विनाकारण शहरात येऊन गर्दी करायला लागले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने शहरातील प्रमुख रस्त्येच रोखून धरले. बुधवारी सकाळपासून बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावर बॅरिगेट्स लावून सावंगी व बोरगाव येथून विनाकारण येणाऱ्यांना परत पाठविले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक व बॅचलर रोडवरील पावडे चौकातही रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे अनेकांना परतून जावे लागले तसेच काहींनी अंतर्गत रस्त्याचा पर्याय शोधला. या नाकेबंदीमुळे काहींना मनस्ताप झाल्याने त्यांनी रोषही व्यक्त केला. पण, आरोग्याचा धोका टाळण्याकरिता या उपाययोजना आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.धोका गंभीर पण, प्रशासन खंबीरजिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ३५५ व्यक्ती बाहेर जिल्ह्यातून आले आहे. ते आणि जिल्ह्यातील काही व्यक्ती असे मिळून १७ हजार ४२७ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील १५ हजार ७६९ व्यक्ती क्वारंटाईन मुक्त झाले तर १ हजार ६५८ व्यक्तीचा अद्याप क्वारंटाईनचा १४ दिवसाचा कालावधी बाकी आहे.आरोग्य विभागाकडून आतापर्यंत १८१ स्त्राव नमुने तपासणीकरिता पाठविले असून त्यापैकी १७४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यापैकी ७ अहवाल प्रलंबित आहे. महिनाभराच्या कालावधीत एकही रुग्ण आढळून आला नसला तरी इतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्ह्याचाही धोका अद्याप संपलेला नाही.नांदेड जिल्हाही वर्ध्याप्रमाणेच निगेटिव्ह होता. पण, आता तेथेही रुग्ण आढळून आल्याने आपल्याही जिल्ह्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून कठोर अंमलबजाणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. नागरिकांनी घरातच थांबावे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.आतापर्यंत आपण ग्रीन झोनमध्ये असलो तरीही धोका संपलेला नाही. बारेगाव, सावंगी यासह शहरालगतच्या परिसरातही भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंची सुविधा असतानाही येथील नागरिक विनाकारण शहरात येऊन गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले. ही गर्दी वाढतच असल्यामुळे आज शहराबाहेरुन येणाºयांसाठी बंदी घालण्यात आली. नागरिकांनी आपापल्या परिसरातूनच वस्तूंची खरेदी करावी. विनाकारण शहरात येऊन गर्दी करु नये.- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.
शहरात ‘संचार’ करणाऱ्यांसाठी नाके‘बंदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 8:34 PM
जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करीत नागरिकांचीही गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे. औषधींसह जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच इतरही महत्त्वाचे दुकाने आठवड्यातून एक दिवस सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ठळक मुद्देतीन ठिकाणी रोखले रस्ते : नागरिकांची वाढतेय वर्दळ, वर्ध्यावर कोरोनाचा धोका अद्यापही कायमच