लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दोन वर्षे कोरोनाने आणि आता पाच महिने कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीची चाके थांबलेली होती. यात महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि कर्मचाऱ्यांनाही वेतनापासून मुकावे लागले; पण न्यायालयाच्या आदेशानुसार २२ मार्चपासून सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यामुळे एसटीही आता पूर्वपदावर आली असून प्रवाशांची सोय झाली. प्रवाशांची गर्दी वाढल्याने जिल्ह्यातील पाचही आगार सध्या हाऊसफुल्ल आहेत.एसटीचा प्रवास हा सुखाचा व सुरक्षित आहे. प्रवाशांना सुविधा देण्याकरिता राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून संपूर्ण खबरदारी घेतली जाते; परंतु विविध कारणाने अपघातही घडत असतात. त्यामुळे अपघात घडल्यास महामंडळाकडून तातडीची मदतही दिली जाते. बहुतांश अपघात हे रस्ते खड्डेमय असल्याने होत असले तरी आता रस्ते गुळगुळीत झाल्यानेही अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. या रस्त्यावर अनेक वाहने भरधाव वेगाने धावतात त्यातच ओव्हरटेक करणे, समोरुन किंवा मागून धडक देणे, वाहने पलटी होणे, ब्रेक फेल होणे, रस्त्याचा किंवा वळणाचा अंदाज न येणे आदी अनेक कारणांनी अपघात होतात; परंतु एसटीने सायकल स्वार, पादचारी किंवा राज्य परिवहन मंडळातील प्रवाशांचा अपघात झाल्यास त्यांना तातडीने मदत दिली जाते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना अपघात झाल्यास तातडीने मदत किंवा लाभही मिळत असल्यामुळेच नागरिकांकडून लालपरीच्या प्रवासाला अधिक पसंती दिली जाते.
अपघातानंतर मदतीसाठी काय कराल अपघात झाल्यानंतर परिवहन महामंडळाकडून मदत केली जाते. जखमींना पी-फॉर्म दिला जातो. फाॅर्म भरून दिल्यावर उपचारासाठीचा खर्च महामंडळ करीत असते.
६५चा स्पीड लॉक एसटीलाप्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटीचा अपघात घडू नये म्हणून एसटीचा ६० किंवा ६५ च्या स्पीडवर बस ब्लॉक केल्या जातात. अचानक अपघाताचा प्रसंग आला तर चालक बस नियंत्रणात ठेवू शकतो यासाठी वेगावर मर्यादा लावली जात असते.
एसटी सहायता निधी अंतर्गत दिली जाते मदतएसटीचा अपघात झाल्यास त्यात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना सहायता निधी अंतर्गत दहा लाखाची मदत दिली जाते. तर गंभीर जखमींना पाच लाखापर्यंत मदत केल्या जाते. जखमी कोणत्याही रुग्णालयात भरती असेल तर उपचारासाठीचा खर्च महामंडळ करते. अपघात झाल्यावर तातडीने किरकोळ जखमी झालेल्यास पाचशे रुपये तर जास्त असल्यास हजार रुपये मदत दिली जाते. मागील वर्षी २० जणांना मदत करण्यात आली; मात्र या पाच महिन्यांत ते निकषात बसत नसल्याने मदत करण्यात आली नाही.
पाच चालकांना उजळणी प्रशिक्षणअपघात हा सांगून होत नाही; मात्र कुठल्याही वाहनाला पावसाळ्यात अपघात घडण्याचा धोका जास्त असतो. कारण रस्त्यावर खड्डे असेल तर त्यात पाणी साचते. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नाही. तर पावसाळ्यात वादळ- वाऱ्याने झाडेझुडपे पडतात. वीज, पाऊस यामुळे ही अंदाज येत नाही. ही बाब लक्षात घेऊन एसटी बस चालकांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यात महत्त्वाच्या सूचना व माहितीचे हे प्रशिक्षण असते तसेच अपघात झाल्यास पुन्हा दहा दिवसांचे ट्रेनिंग दिले जाते.