वर्धा: समाजकल्याण दलितवस्ती सुधार निधीतर्गत म्हसाळा येथील वॉर्ड 5 मधील मंजूर रस्ता चोरीला गेला आहे. हा रस्ता जिल्हा परिषेदेच्या बांधकाम विभागाने संगणमत करून लांबविल्याचा आरोप जिल्हा परिषेदेचे मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या तक्रारातून करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे नेमके काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
म्हसाळा येथील वॉर्ड 5 मध्ये 2016-17 मध्ये समाजकल्याण दलितवस्ती सुधार निधींतर्गत रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. या रस्त्याच्या कामाचे भुमिपूजनही थाटात करण्यात आले. विशेष म्हणजे याचवेळी वार्डातील आणखी एका रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. या दोन रस्त्यांपैकी कांबळे ते मेंढे यांच्या घरापर्यंतचा रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्याला तीन वर्षाचा कालावधी लोटला. मात्र, थूल ते पाटील यांच्या घरापर्यंतचा रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचा विसरच जि.प.च्या बांधकाम विभागाला पडल्याचे दिसून येत आहे.
रस्त्याचे काम करण्यात आले नाही. त्याचबरोबर सिमेंट नाली बांधण्याची काम ही करण्यात येणार होते. परंतु, तेही करण्यात आले नाही. याबाबत ग्रा.पं. प्रशासनाला विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे दिली जात नाही. त्यामुळे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही वासुदेव थूल, शंकर थूल, संजय पाटील, सुलोचना पाटील, राहुल मेंढे, यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे.
प्रत्यक्ष कामापुर्वीच काढले देयक
वार्ड क्रमांक 5 मधील थूल ते पाटील यांच्या घरापर्यंतचा सिमेंंट रस्ताचे काम पूर्ण करण्यात आले नाही.परंतु, गौडबंगाल करीत शासनाला चुना लावणाऱ्यांनी सदर कामाचे देयकेही काढल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.हा संपूर्ण प्रकार शासकीय निधीचा अपहार करणारा ठरत असल्याने उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
आपण या प्रकरणाबाबत चौकशी करीत अहो.काही अनुचित प्रकार अढळल्यास संबंधीतांवर कठोर कारवाई करण्यात येईल. - डॉ.सचिन ओंबासे,मुख्य कार्यपालन अधिकारी