अनेक संसार उघड्यावर
सिंदी (रेल्वे) : जिल्ह्यात गत आठवड्यापासून वादळाचा तडाखा बसत आहे. बुधवारी सायंकाळी समुद्रपूर तालुक्यातील विखणी या गावात चक्रीवादळाने चांगलाच कहर केला. यात गावातील बहुतांश घरांवरील छपरे उडून गेली. झाडे कोसळल्याने विद्युत तारा तुटल्या, १३ जण छपराखाली दबले, मात्र सुदैवाने जिवितहानी झाली नाही. अवघ्या पाच मिनिटांत हे चक्रीवादळ सुमारे ७० टक्के घरे उद्ध्वस्त करुन गेले. यात गावकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सिंदी(रेल्वे)पासून अवघ्या ५ कि़मी. अंतरावर ७०० लोकवस्तीचे विखणी हे गाव आहे. सायंकाळी दिवाबत्ती बेळ झाली होती. प्रत्येकजण आपल्या घरी होते.
अचानक सुसाट्याचा वारा सुरू झाला. सध्या जिल्ह्यात सर्वत्र वादळी वारे सुरू असल्यामुळे गावकर्यांना याच्या गंभीर परिणामाची कल्पना आली नाही. काही क्षणातच गावात चक्रीवादळ घोंघावत आले. अवघे पाच मिनिटात होत्याचे नव्हते झाले. एकाएकी आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे विखणी गावातील अनेक कुटुंब बेघर झाले. सुदैवाने यात जीवितहाणी झाली नाही. उल्लेखनीय, या वादळाची पसिरातील एकाही गावाला झळ पोहचली नाही. घरावरील टिना शेकडो फुट दूर उडून गेल्या. घराच्या भिंतीनाही याची झळ पोहचली. गावात आलेले हे वादळ चक्रीवादळ असल्याचे गावकरी सांगतात.
निसर्गाचा हा थरार पहिल्यांदाच बघितल्याचे ज्येष्ठ मंडळींचे म्हणणे आहे. या वादळाने गावात चांगलेच थैमान घातले. वादळात येथील ६० ते ७० घरे उद्ध्वस्त झाली. विद्युुत खांब वाकले. यामुळे परिसरातील विद्युत पुरवठाही खंडीत झाला. घरात राहण्याची वा स्वयंपाक करण्याची सोय राहिली नाही. या आपत्तीची माहिती गावकर्यांनी अधिकार्यांना दिली. समुद्रपूरच्या तहसीलदार पुष्पलता कुमरे यांनी आपल्या कर्मचार्यांसोबत एक ते दीड तासातच या गावाला भेट देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. गुरुवारी तलाठी व ग्रामसेवकाला पाठवून गावात झालेल्या नुकसानीचा सर्वे करण्यात आला. गावात आलेल्या आपत्तीत गावातील अनिल कुरसंगे, नरेश घवघवे, प्रवीण साटोणे, श्रीकांत साटोणे, किशोर लोंढे, प्रशांत साटोणे, सुमीत साटोणे आदींनी मदत कार्यासाठी सहकार्य केले.(प्रतिनिधी)