राज्य पुरस्कार रोव्हर टेस्टींग कॅम्प : समाजसेवा व देशप्रेमाचे दिले धडे वर्धा : तीन दिवसीय रोव्हर टेस्टिंग राज्य पुरस्कार प्रशिक्षण शिबिराचा समारोप साहसी प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणातून झाला. या शिबिरात विद्यार्थ्यांना देशप्रेम, समाजसेवा, साहसी उपक्रम, आपत्ती व्यवस्थापन, जंगल भ्रमंती, बिनभांड्यांचा स्वयंपाक व नेतृत्वकला याची शिकवण देण्यात आली. सेवाग्राम येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्काऊटचे जिल्हाध्यक्ष सतीश राऊत तर प्रमुख अतिथी शिक्षणाधिकारी डुरे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, राज्य मुख्यालय आयुक्त रामकुमार जयस्वाल, जिल्हा संघटक प्रकाश डाखोळे, शिबिर प्रमुख तथा जिल्हा मुख्यालय आयुक्त कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर उपस्थित होते. रोव्हर स्काऊटच्या अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या मुलांमध्ये जीवनात कोणत्याही संकटांचा सामना करण्याची मानसिकता तयार होते. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व विकासाच्या उपक्रमाला अभ्यासक्रमासोबत प्राधान्य दिल्यास सुजान व जागरूक पिढी तयार होईल. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात रोव्हर स्काऊटींगचा उपक्रम आवश्यक करावा, असे प्रतिपादन डुरे यांनी यावेळी केले. यानंतर बोलताना सतीश राऊत म्हणाले, स्काऊटचे प्रशिक्षण ‘कृतीतून शिक्षण’ व खिलाडी पद्धतीवर आधारित असल्यामुळे मुलामुलींचे व्यक्तिमत्व विकसित होते. तर मुरलीधर बेलखोडे यांनी निसर्ग अभ्यासाचा उपक्रम रोव्हर स्काऊटींगमध्ये समाविष्ट असल्यामुळे युवा पिढीत व समाजात पर्यावरणाबाबत जागृती निर्माण होण्यात सहकार्य मिळ्त असून याची नितांत गरज असल्याचे सांगितले. कॅप्टन प्रा. गुजरकर यांना जिल्हा प्रशिक्षण आयुक्त तथा रोव्हर लिडर किरण जंगले, रोव्हर लिडर प्रा. रवींद्र गुजरकर, रोव्हर लिडर संतोष तुरक, रोव्हर लिडर रितेश जयस्वाल यांनी शिबिरात सहकार्य केले. यात नऊ रोव्हर्संने प्राविण्य प्राप्त केले. या परीक्षेचा अहवाल राज्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. राज्य पुरस्कार रोव्हर मिळविणारी ही दुसरी बॅच असल्याची माहिती गुजरकर यांनी दिली. राज्य कार्यालय व जिल्हा कार्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी भेट दिली.(स्थानिक प्रतिनिधी)
साहसी प्रात्यक्षिकातून रोव्हर शिबिराचा समारोप
By admin | Published: April 28, 2017 2:09 AM