नवजीवन योजना मार्गदर्शन सोहळा : दुर्लक्षित घटकांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न वर्धा : पारधी समाजाच्या उत्कर्षाकरिता त्याचप्रमाणे त्यांना रोजगार मिळवून देत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पोलीस विभागाच्यावतीने नवजीवन योजना राबविण्यात येत आहे. शासनाच्या योजना, सुविधा संबंधाने उचित मार्गदर्शन मिळण्यासाठी वर्धा पोलीस विभागाच्यावतीने विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले. शासकीय योजनांबाबत भेडसावणाऱ्या समस्यांबाबत अवगत करून समस्यांच्या निवारणाकरिता पोलीस मुख्यालय येथे मार्गदर्शन सोहळा घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील ८०० पारधी बांधव उपस्थित होते. जिल्हा पोलीस विभागाकडून पारधी समाजातील दारू गाळणारे, विक्री करणारे, अवैध व्यवसाय करणारे तसेच गुन्हेगारीकडे वळलेल्या बेरोजगार महिला, पुरूषांना अवैध कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी नवजीवन योजना आहे. या समाजातील लोकांना समाजात सन्माने जगता यावे म्हणून रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येत आहे. नवजीवन योजनेअंतर्गत पारधी बेडा वायफड, पांढरकवडा, आंजी, अंदोरी व बोरगाव येथील बेरोजगार महिला व पुरूषांना निरनिराळ्या संस्थांच्या सहकार्याने फ्लोअर क्लिनर, रोपवाटिका, धुपबत्ती तयार करणे, शेळीपालन इत्यादीचे विविध प्रकल्पाद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण करून सर्व प्रशिक्षणार्थी प्राप्त ज्ञानाने स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पारधी समाज असून या समाजातील बहुतांश व्यक्ती दारू गाळणे व दारूची विक्री करणे हा व्यवसाय करतात. पारधी समाज हा अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडत असून शासकीय योजनांबाबत त्यांना पुरेसे ज्ञान नसल्याने ते मागास राहिले. या समाजाल मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य या उपक्रमात केले जात आहे. या मार्गदर्शन सोहळ्यात बेड्यावरील प्रतिनिधींनी पारधी बेड्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची मांडणी केली. यानंतर बोलताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले, पारधी लोकांना भेडसावणाऱ्य समस्या तसेच सदर समस्यांवर मात करण्याकरिता, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचाव्या. तसेच पारधी बेड्यांवर पोहचण्याकरिता पायाभूत सुविधा, पाणी, वीज रस्ते देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. त्यांच्या समस्या सोडविण्याचा तसेच रोजगार उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील असे त्यांनी यावेळी सांगितले. पारधी समाजाने आपआपल्या बेड्यात तीन बचत गटाची स्थापना करून सदर बचत गट यशस्वीरित्या चालवून दाखवावे. तीन महिन्यानंतर सदर गावात शासनातर्फे समाजभवन बांधून देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवाल यांनी दिली. पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी वर्धा पोलीस विभाग मागील दिड वर्षापासून पारधी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता नवजीवन योजना राबवित आहेत. याकरिता उपस्थित पारधी समाजातील बांधवांना अवैध दारूनिर्मिती व विक्री करण्यापासून परावृत्त करणे हा उद्देश असून याकरिता पर्यायी बाब म्हणून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. यानंतर बोलताना सीईओ नयना गुंडे म्हणाल्या, पारधी समाजबांधवांना शासकीय योजनांचा लाभ देण्याची गरज आहे. त्याची माहिती करुन द्यावी. रोजगार निर्मितीत त्यांना सहाय्य मिळेल. या सबंधाने पाठपुरावा करण्याच्या सूचना गुंडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. तसेच पारधी बेड्यांमध्ये शौचालयाची सुविधा नसल्याचे घाणीचे साम्राज्य असते. आरोग्याच्या दृष्टीने येथे शासकीय योजनेअंतर्गत शौचालय बांधून येईल, अशी ग्वाही दिली. पारधी बांधवांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासंबंधाने कृषी, पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते, बचत गट, रोजगार, दुग्धव्यवसाय, मुलींना मोफत सायकल वाटप, जनधन योजना याबाबत मार्गदर्शन केले. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उपस्थित मान्यवरांची प्रक्रिया समाजावून सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमस्थळी शासकीय योजनासंबंधाने माहिती मिळावी म्हणून योजना तसेच रोजगार उपलब्धतेचे स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन सहायक पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)
पारधी समाजाला रोजगाराभिमुख प्रकल्पाचे प्रशिक्षण
By admin | Published: March 18, 2017 1:15 AM