लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील सहा दिवसांत उपप्रादेशिक परिवहन विभागाने धडक मोहीम राबवून तब्बल ३२ खासगी बसेसवर कारवाई केली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या या धडक कारवाईमुळे मनमर्जीचा सपाटा लावणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.दिवाळी सणाचे औचित्य साधून अनेक नागरिक जिल्ह्याबाहेर जातात तर अनेक नागरिक आपल्या मूळ गावी परततात. त्यामुळे याच दिवसांत खासगी प्रवासी वाहतुकीला उधाण येत अनेकदा प्रवाशांची लूट होते. प्रवाशांनाही चांगली सेवा मिळावी तसेच आर्थिक फसवणूक टळावी, या हेतूने वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो. समीर मो. याकूब यांच्या मार्गदर्शनात ९ ऑक्टोबरपासून धडक खासगी बसेस तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने १०३ खासगी बसेसची तपासणी केली असता ३२ खासगी बसेस दोषी आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे. ही कारवाई तुषार बोबडे, विशाल मोरे, गोपाल धुर्वे, विशाल भगत, निखिल कदम आदींनी केली. ही मोहीम २३ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे खात्रीदायक सूत्रांकडून सांगण्यात आले.
जादा प्रवासी भाडे घेणाऱ्यांवरही होणार कठोर कारवाई- नियमानुसार निश्चित प्रवासी भाड्यापेक्षा कुणी खासगी बस व्यावसायिक जास्त प्रवासी भाडे घेत असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थेची नागरिकांनी थेट उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार करावी. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.
१०३ खासगी बसेसची झाली तपासणी३२खासगी वाहने आढळले दोषी
प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, तसेच मनमर्जीचा ब्रेक लागावा या हेतूने ९ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात विशेष खासगी बसेस तपासणी मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत १०३ खासगी बसेसची तपासणी केली असून त्यापैकी ३२ बसेस दोषी आढळल्या आहेत.- मो. समीर मो. याकुब, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.