आकोली : खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासोद स्मशानभूमी नजीक मृतदेह गाडून असल्याची वार्ता पसरली. ही माहिती मिळताच ठाणेदार प्रशांत पांडे यांनी घटनास्थळ गाठले. याची माहिती कारंजाचे नायब तहसीलदार कातोरे यांना देण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत खड्डा खोदला असता तिथे बोकडाचे मुंडके, बाहुल्या, पुजेचे साहित्य आढळून आले. मृतदेहाची वार्ता अफवा निघाली असली तरी हा प्रकार भानामतीचा असल्याची नवी चर्चा सुरू झाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. सकाळी मासोद गावाजनीकच्या स्मशानभूमीत दगड-मातीने मृतदेह गाडून ठेवल्याची अफवा गावात पसरली. खरांगणा पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार प्रशांत पांडे यांच्यासह विनोद इंगोले, सतीश घवघवे घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळी काही कापड व बाहुली दिसून आली. शिवाय परिसरात दुर्गंधीही येत होती. त्यामुळे मृतदेहाच्या संशयावरून पोलिसांनी कारंजाचे नायब तहसीलदार कातोरे यांना प्रकाराची माहिती दिली. तहसीलदारांनीही वेळ न दवडता घटनास्थळ गाठले. त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून ग्रामस्थांच्या मदतीने खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्यात आढळलेल्या वस्तू पाहून उपस्थित सारेच चक्रावून गेले. या प्रकारामुळे गावात विविध चर्चेला पेव फुटल्याने याचा शोध लावण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)अंनिस करणार खुलासा ४हा प्रकार खोडसाळपणातून झाला असावा. करणी, जादूटोणा, चेटूक किंवा मंत्रोपचाराने कुणालाही बंधन घालता येत नाही. यामुळे मासोद परिसरातील नागरिकांनी कुठलीही भीती वा दडपणात राहण्याची गरज नाही. या प्रकरणाचा लवकरच खुलासा करण्यात येणार असल्याचे अंनिसचे पंकज वंजारे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.खून झाल्याची अफवा होती. पंचनामा करून तहसीलदारांसमक्ष खड्डा खोदला असता त्यात बोकडाचे मुंडके, बाहुल्या व पुजेचे साहित्य आढळले.- प्रशांत पांडे, ठाणेदार, खरांणगा
मासोद परिसरात मृतदेहाच्या अफवेने खळबळ
By admin | Published: April 05, 2016 4:34 AM