ऑनलाईन लोकमतवर्धा : गारपीट अन् अवकाळी पाऊस यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आलेला पाऊस याचीच आठवण देत आहे. सध्या रबी हंगामातील उत्पादन काढण्याच्या तयारीत शेतकरी असताना पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे व दिवसभर असलेल्या ढगाळी वातावरणामुळे त्याच्या आशा झाकोळल्याचे चित्र आहे. ढगाळी वातावरण असल्याने केव्हा वादळी पाऊस येईल अन् केव्हा गारपीट होईल याचा नेम नसल्याने शेतकरी दिवसभर चिंतेत असल्याचे दिसून आले.सध्या शेतकऱ्यांच्या शेतात गहू आणि चणा हे रबीचे मुख्य पीक आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतात तुरीच्या गंजा कायम असून कापूसही वेचणे शिल्लक असल्याचे दिसून येते. रबीचे पीक घेणाऱ्या काही शेतकऱ्यांनी चणा काढून त्याची गंजी लावून ठेवली आहे. उन्ह तापताच चणा वाळून तो काढण्याची त्याची तयारी होती;पण मध्येच पाऊस आल्याने चण्याची गंजी झाकण्यासाठी सकाळपासूनच त्याची चांगलीच धावपळ झाली. तर शेतात उभा असलेला गहू कायम रहावा यासाठी शेतकरी पावसाचे वातवरण निघावे अशी आशा धरून वरूण राजाला साकडे घालताना दिसून आला. यंदाच्या वर्षांत शेतकरी नैसर्गिक संकटाने पूरता हताश झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज अवकाळी पाऊस जिल्ह्यात आला. सकाळी आलेला पाऊस जोराचा नसल्याने निघण्याच्या काळात असलेला गहू सकाळच्या सुमारास उभा होता; मात्र दिवसभर असलेल्या ढगाळी वातावरणामुळे हा गहू केव्हा लोळेल याचा कुठलाही नेम नसल्याचे शेतकरी बोलताना दिसून आले. बऱ्याच भागात अजूनही कापूस शेतात आहे. मजुरीच्या वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना तो काढणे अद्यापही शक्य होत नसल्याचे दिसून आले. त्यातच सकाळी आलेल्या पावसाचा फटका त्यांना बसला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने द्यावी, तसेच गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
फेब्रुवारीच्या गारपिटीच्या जखमा ताज्याचफेब्रुवारी महिन्यात अख्या राज्याला गारपीटाने झोडपून काढले. यात वर्धा जिल्हाही सुटला नाही. या काळात तूर आणि कापसाचे मोठे नुकसान झाले. तर भाजीपाला आणि बागायतदार शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. आता पावसाचा फटकाही त्यांना बसण्याची शक्यता आहे. पाऊस व ढगाळी वातावरणामुळे संत्र्याला नुकताच धरलेला आंबिया बहर झडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याचे सांगण्यात येत आहे.गत महिन्यात आलेल्या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचे आदेश शासनाने काढले. त्यानुसार सर्व्हे झाले. यानंतर मदत देण्याच्या सूचना आल्या;पण यात असलेल्या अटींमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाना पाने पुसल्याचेच दिसून येत आहे. पुन्हा जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जुन्याच नुकसानाची मदत अद्याप नाही मग नव्याने झालेल्या नुकसानाची मदत केव्हा, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.