वर्धा : येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणातील आरोपीने जामिनाकरिता अर्ज सादर केला होता. यावर सोमवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली असून आरोपी आसिफ शहा उर्फ मुन्ना पठाण याचा जामीन नाकारण्यात आला. जामीन नाकरण्याचा निर्णय येथील न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी दिला.शहरातील आर्वी नाका परिसरातील वडार झोपडपट्टी येथील रूपेश हिरामन मुळे याचा नरबळी देण्यात आला होता. या प्रकरणी वर्धा पोलिसांनी आसिफ शहा याला अटक केली होती. त्याने अघोरी विद्या प्राप्त करण्याकरिता रूपेशचा नरबळी दिल्याचे कबूल केले होते. यावरून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. अटकेत असलेल्या आसिफच्या परिवारातील सदस्यांनी यवतमाळ येथील वकिलाच्या मदतीने जामिनाकरिता न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर गत दोन महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. प्रत्येक सुनावणीला तारीख वाढविण्यात येत होती.यात अखेर सोमवारी या प्रकरणावर न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांच्या न्यायालयात युक्तिवाद झाला. यात न्यायाधीशांनी आरोपी आसिफ शहाचा जामीन नाकारला. सरकार पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता अनुराधा सबाने यांनी काम सांभाळले. यावेळी प्रकरणाचे तपासी अधिकारी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. बुराडे यांच्यासह रूपेशचे आई-वडिल उपस्थित होते.(प्रतिनिधी)
रूपेश मुळे नरबळी प्रकरण; आरोपीचा जामीन नाकारला
By admin | Published: June 10, 2015 2:20 AM